चिपळूण: सह्याद्री महाराष्ट्रातील एक उपक्रमशील शैक्षणिक संस्था- बाबासाहेब भुवड बुद्धिबळ स्पर्धेचा आयोजन सावर्डे- ‘ज्योत ज्ञानाचे दौलत राष्ट्राची’ या ब्रीदवाक्याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये २९ नोव्हेंबर १९५८ रोजी सह्याद्री शिक्षण संस्थेची स्थापना स्व. गोविंदरावजी निकम यांनी सावर्डे येथे न्यू इंग्लिश स्कूल सावर्डे ही माध्यमिक शाळा सुरू करून केली. कोकणातील विद्यार्थ्यांची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही याची जाणीव शिक्षण महर्षी स्व.गोविंदरावजी निकम यांना झालेली होती. स्व.अनुराधाताई निकम यांनी त्यांना जीवनभर अत्यंत मोलाचे सहकार्य केले. आज संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची ३३ माध्यमिक विद्यालये व अनेक व्यवसायिक महाविद्यालये अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सह्याद्रीत अविरत प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच आज ही शिक्षण संस्था महाराष्ट्र राज्यात एक उपक्रमशील व नामांकित शिक्षण संस्था म्हणून नावारूपाला आलेली आहे. असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड यांनी केले.
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २९ नोव्हेंबर हा ६५ व्या संस्था स्थापना दिनाचे औचित्य साधून संस्थांतर्गत बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, संचालिका आकांक्षा पवार उद्योजक प्रशांत निकम सचिव महेश महाडिक सावर्डे आयटीआयचे प्राचार्य उमेश लकेश्री.विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, फुरुस विद्यालयाचे मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक उदयराज कळंबे,सर्व क्रीडा शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.,या दिनानिमित्त संस्थेच्या विस्ताराची सर्व विद्यार्थ्यांना माहिती व्हावी व संस्थेच्या प्रगतीचा आढावा विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहचावा या उद्देशाने श्री.अशोक शितोळे व श्री. साजिद चिकटे यांनी तयार केलेल्या सचित्र भित्तीपत्रकाचे उद्घाटन विद्यालयाचे पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्राचार्य राजेंद्र वारे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमाविषयी व शैक्षणिक प्रगती विषयी माहिती दिली. अशोक शितोळे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.