जागतिक एडस् दिन सप्ताहांतर्गत एडस् विरोधी प्रभात फेरी
रत्नागिरी: आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने दक्ष रहावे. युवा अवस्थेपासून एचआयव्ही पासून आपले संरक्षण करणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.
जागतिक एड्स दिन सप्ताह २०२३ अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा रुग्णालयाच्यावतीने शासकीय रुग्णालयात जिल्हा आणि तालुकास्तरावर एड्स विरोधी प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. के फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एम. गावडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. व्ही. कुमरे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य ) डॉ. ए. शिरसाट तसेच विविध महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापक वर्ग, रुग्णालयीन वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वृंद उपस्थित होता.
जिल्हाधिकारी श्री. सिंह आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये म्हणाले, प्रत्येकाने आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी दक्ष रहावे. युवा अवस्थेपासून आपले एचआयव्ही पासून संरक्षण गरजेचे आहे. सर्वानी आपली एचआयव्ही स्थिती जाणून घेण्याबाबत त्यांनी आवाहन केले.
जिल्हास्तरीय प्रभातफेरीमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत
सहभागी महाविद्यालयीन विद्यार्थी समूहास एडस् विरोधी शपथ देवून प्रभातफेरीची सुरुवात करण्यात आली. या प्रभातफेरीमध्ये शहरातील विविध महाविद्यालयीन विद्यार्थी वर्गाने आपल्या संस्थेचा गणवेश परिधान करुन हातामध्ये एडस् विरोधी घोषवाक्याचे फलक प्रदर्शित करीत आणि घोषणाद्वारे जनतेस एडस् विरोधी लढ्यामध्ये
सामील होण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. के. फुले यांनी सांगितले, युवा पिढी व जनसामान्यांमध्ये एचआयव्हीची मोफत तपासणी आणि एचआयव्ही बाधितांबरोबर कलंक व भेदभाव बाबत व्यापक जनजागृती करणे गरजेचे आहे.