संकटग्रस्त पक्ष्याच्या संवर्धनासाठी अनोखे पाऊल
महाधनेशला वाचवण्यासाठी सह्याद्री संकल्प सोसायटीने त्याचे घरटे दत्तक घेण्याचे आवाहन केले आहे.
संगमेश्वर: महाधनेश सह्याद्रीच्या जंगलात आढळणारा कोकणाशी नाळ जोडला गेलेला, देवराया, जंगल आणि क्वचित मानवी वस्तीजवळ आढळणारा देखणा पक्षी. या महाधनेशचे घरटे दत्तक घेण्याचे आवाहन सह्याद्री संकल्प सोसायटीने निसर्गमित्रांना केले आहे.
महाधनेशच्या पंखांचा होणारा मोठा आवाज आणि दूरवरून ऐकू येणारी त्यांची साद यामुळे सर्वांच्याच परिचयाचा. भेळा, शेवर, आंबा, सातविण अशा झाडांच्या ढोल्या निवडून त्यात आपल्या पिल्लांना हे पक्षी वाढवत असतात. फलाहारी असल्यामुळे वड, पिंपळ, उंबर, भेरलीमाड, घुरवड, काजरा, चांदफळ अशा देववृक्ष आणि रायांमधील पुराण वृक्षांची फळे खाऊन हे पक्षी आपली उपजीविका करतात. या देववृक्षांच्या बिया सर्वदूर पोहोचवून वृक्ष निर्मिती आणि वृक्षप्रसाराचे महान कार्य अखंडपणे करत राहणारा हा पक्षी आता मात्र संकटात सापडला आहे.
खासगी जमिनीतील वृक्षतोड, बागायती लागवड, जंगलांचा होणारा विनाश आणि दिवसागणिक संकुचणाऱ्या देवराया यामुळे जुने वृक्ष केव्हाच करवतींच्या हवाली झाले आहेत. नवीन वृक्षारोपण होत असले तरी त्यांचे मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतर होण्यासाठी अनेक वर्ष बाकी आहेत. इतकी वर्ष धनेश पक्षी मात्र संकटाचा सामना करू शकतील का? हा खरा प्रश्न आहे. यामुळेच सद्यःस्थितीतील पुराण वृक्ष, ढोल्या असणारी झाडे वाचवणे ही तातडीची गरज बनली आहे. यासाठीच सर्वांची मदत अत्यंत आवश्यक आहे. सह्याद्री संकल्प सोसायटी धनेश पक्ष्याचा अधिवास आणि ढोल्या असणारे वृक्ष वाचवण्यासाठी कटिबद्ध आहे. आपणही असे वृक्ष दत्तक घेऊन या अभियानात सहभागी व्हा आणि संवर्धनाच्या पवित्र कार्यात आपला सहभाग नोंदवा, असे आवाहन सह्याद्री संकल्प सोसायटीने केले आहे.
वृक्षारोपणाची गरज
खासगी जमिनीतील वृक्षतोड, बागायती लागवड, जंगलांचा होणारा विनाश आणि दिवसागणिक संकुचणाऱ्या देवराया यामुळे जुने वृक्ष केव्हाच करवतींच्या हवाली झाले आहेत. नवीन वृक्षारोपण होत असले तरी त्यांचे मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतर होण्यासाठी अनेक वर्ष बाकी आहेत. या संकटाचा सामाना धनेश पक्षी मात्र संकटाचा सामना करू शकतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी वृश्रारोपण करणे गरजेचे बनले आहे.