मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
रत्नागिरी:- लोटे एमआयडीसीत कोकाकोला प्रकल्प उभारण्यात येत आहे. आज गुरूवार, ३० नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भुमीपूजन होत असून दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत.
रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील अतिरिक्त लोटे एमआयडीसीच्या परीसरात हा प्रकल्प उभारला जात आहे.
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यापूर्वीच त्यांच्या चिपळूणच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भुमीपुजन होणार असल्याचे सांगितले होते. या कार्यक्रमाला औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधीकारी उपस्थित राहणार आहेत.
जवळपास ९० हेक्टर जागेवर हा कोकाकोला प्रकल्प उभारण्यात येत आहे. यासाठी साधारण ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्युयॉर्क दौऱ्यात या प्रकल्पाच्या करारावरती सह्या केल्या होत्या. परंतु मध्यंतरी हा प्रकल्प रखडला होता. आता मंत्री उदय सामंत यांनी विषेश लक्ष देऊन हा प्रकल्प मार्गी लावला आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांसाठी अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.