जाकादेवी/वार्ताहर :-रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे दिला जाणाऱ्या कै. सदानंद बळीराम परकर यांच्या स्मरणार्थ आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी आपले प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन मालगुंड एज्युकेशन सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.
कै.सदानंद बळीराम परकर यांनी मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमनपद, तसेच बळीराम परकर विद्यालय व भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापकपद अतिशय नेटाने आणि यशस्वीपणे सांभाळले.
कै. सदानंद परकर हे उपक्रमशील व विद्यार्थ्यांसाठी धडपडणारे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते. त्यांना जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय आदर्श पुरस्कारांनी सन्मानित केले गेले होते.
कै. सदानंद परकर सरांच्या आदर्शवत कार्याचे सदैव स्मरण राहावे, यासाठी मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्यावतीने प्रतिवर्षी माध्यमिक शाळांतील शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार दिला जातो. ५ हजार रुपये रोख , मानपत्र , स्मृतिचिन्ह व शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
तरी रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील इच्छुक शिक्षकांनी आपले प्रस्ताव सेक्रेटरी, मालगुंड एज्युकेशन सोसायटी , मालगुंड (बळीराम परकर विद्यालय, मालगुंड) ता.जि. रत्नागिरी यांच्या नावे १५ डिसेंबरपर्यंत पाठवावेत, असे आवाहन मालगुंड शिक्षण संस्थेतर्फे सेक्रेटरी ,श्री.विनायक तुकाराम राऊत (९४२३२९१०२८) यांनी केले आहे.