सिंधुदुर्ग-जिल्ह्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. ही माझ्यासह तमाम मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
४ डिसेंबर रोजी नौसेना दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. हा सोहळा काही दिवसांवर आला असल्याने सर्व यंत्रणांनी उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी शनिवारी दिले.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळा व नौसेना दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल, नौदलाचे अधिकारी तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचे काम आणखी गतीने करावे, तसेच तारकर्ली येथील एमटीडीसी परिसरातील उर्वरित कामे लवकर पूर्ण करावीत, कार्यक्रमाच्या ठिकाणी पर्यायी विद्युत यंत्रणा कार्यान्वित करावी जेणेकरुन ऐनवेळी समस्या निर्माण होणार नाही, सागरी सुरक्षेवर अधिक भर द्यावा, किल्यावर लेझर शो होणार असल्याने तिथे देखील विजेची यंत्रणा उभारण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चिपी विमानतळावर करण्यात येणाऱ्या कामासंबंधी माहिती घेतली तसेच चिपी विमानतळावर कायमस्वरूपी रात्रीच्या वेळी विमान उतारण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले. बैठकीच्या सुरूवातील जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी पूर्वतयारी विषयी सादरीकरण केले.
प्रत्यक्ष स्थळांची पाहणी
बैठकीनंतर चव्हाण आणि केसरकर यांनी मालवण येथील टोपीवाला ग्राऊंड, राजकोट किल्ला, तारकर्ली किनारा परिसर येथे भेट देऊन संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
नौसेना दिन आणि छ.शिवराय पुतळा अनावरण कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा – रवींद्र चव्हाण
