युवा एकता सामाजिक संस्थेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
संगमेश्वर:-मागील अनेक महिन्यांपासून संगमेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील गैर व्यवहार प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. कोळंबे सोनगीरी ग्रामपंचायत, मुचरी ग्रामपंचायत व मौजे असुर्डे ग्रामपंचायत या गावातील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैव्यवहार प्रकरणी देवरूख संगमेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. भरतजी चौघुले , विस्तार अधिकारी गिरी व घुले यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती मात्र या तक्रारीची अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नसल्याने युवा एकता सामाजिक संस्थेने उपोषणाचे हत्यार उपसले आहे. उपोषणा संदर्भात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांना गुरुवारी (२३ नोव्हेंबर २०२३) निवेदन देण्यात आले आहे.
ग्रामपंचायतींमधून झालेल्या गैरव्यवहार प्रकरणातील तक्रारींवर गटविकास अधिकारी हे कोणतीही दखल घेत नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्याकडे तक्रार करण्यात आली. परंतु पुजार देखील तक्रारीची दखल घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. यावर कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने स्मरणपत्र काढून देखील संबंधितांवर कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाहीं. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व तिन्ही ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच, उपसरपंच,सदस्य व ग्रामसेवक यांचा एकमेकांशी साटलोट आहे का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या चर्चेतील प्रकरणावरून आता अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय शंकाही उपस्थित होत आहे.
अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी
या गैरव्यवहारबाबत ग्रामस्थांच्या मागण्यांसंदर्भात युवा एकता सामाजिक संस्थेच्या वतीने गुरूवारी (दिनांक २३ नोव्हेंबर २०२३) जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, शासकीय अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावे तसेच तिन्ही ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी लोकशाही असलेल्या या संघराज्याच्या नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशा दोन मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
पंधरा दिवसात कारवाई करा अन्यथा….
मागील एक वर्षापासून तिन्ही ग्रामपंचायतमधील नागरिक गैरव्यवहार प्रकरणी शासनदरबारी पत्रव्यवहार करत आहेत. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेतली गेली नाहीं. पुढील 15 दिवसात संबंधितावर कारवाई करावी, कारवाई न केल्यास भारतीय घटनेचे शिल्पकार प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी (६ डिसेंबर २०२३ रोजी) सकाळी अकरा वाजता आपल्या दालनात तिन्ही ग्रामपंचायतीच्या नागरिकांकडून बेमुदत आमरण उपोषणाला बसण्याचा थेट इशाराच निवेदनातून देण्यात आला आहे. याबाबत आता जिल्हाधिकारी संबधितांवर कारवाई करनार की ग्रामस्थांना उपोषणाला प्रवृत्त करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
कोळंबे वस्तीगृह येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याबाबत आणि ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी देवरूख संगमेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. भरत चौगुले, विस्तार अधिकारी श्री.गिरी व श्री. गुळे हे उपस्थित होते. त्यावेळी या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या प्रश्नांचे,तक्रारीचे निवारण करणे अपेक्षित होते. मात्र या सभेत गावातील नागरिकांच्या व्यथा न ऐकताच अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना धाक दाखवत गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेविका यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता. तसेच प्रकरण अंगलट येणार हे माहीती होताच अधिकारी भर ग्रामसभेतून उठून निघून गेल्याचा प्रकार या ग्रामसभेत घडला होता.
सरकारकडून भरमसाठ निधी दिला जातो मात्र विकासात्मक दृष्टीकोन ठेवून निधी योग्य पद्धतीने वापरण्याची मानसिकता दिसत नाही. कोळंबे सोनगीरी ग्रामपंचायतीमधील गैव्यवहार प्रकरणाला एक वर्ष होत आले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाला तरीही वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही हेच दुर्दैव आहे. भ्रष्ट्राचाराला आळा बसावा ही आमची भूमिका आहे. या गैव्यवहार प्रकरणी संबधितांवर तात्पुरती कारवाई न करता, ठोस कारवाई करावी हीच आमची मागणी आहे.