रत्नागिरी:-खल्वायनच्या दिवाळी पाडवा संगीत सभेत पुण्याच्या मंजिरी कर्वे – आलेगावकर यांचे गायन येत्या मंगळवारी होणार आहे.
येथील खल्वायन संस्थेची दिवाळी पाडवा विशेष संगीत मैफल येत्या मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७.३० या वेळेत गुरुकृपा मंगल कार्यालयात होणार आहे.
पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कुमार गंधर्व गायकी विचार दर्शन या कार्यक्रमाद्वारे पुण्याच्या प्रसिद्ध गायिका विदुषी सौ. मंजिरी कर्वे-आलेगावकर शब्द आणि सुरांद्वारे कुमार गंधर्व यांची गायकी श्रोत्यांसमोर उलगडून दाखविणार आहेत.
मंजिरी कर्वे – आलेगावकर आकाशवाणी व दूरदर्शनच्या टॉप ग्रेड आर्टिस्ट असून त्यांना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या हस्ते कुमार गंधर्व पुरस्कार मिळालेला आहे. माणिक वर्मा, स्वरसाधना, राजहंस प्रतिष्ठान आणि संगीत शिरोमणि या पुरस्कारांनीसुद्धा त्या सन्मानित आहेत. गायनाचार्य पंडित रामकृष्णबुवा वझे यांचे शिष्य व मंजिरीताईंचे वडील, व गुरू पंडित मोहन कर्वे यांच्याकडून त्यांना शास्त्रीय संगीताचे सुरवातीला शिक्षण मिळाले. त्यानंतर पंडित नवनीतभाई पटेल, कै. वामनरावजी देशपांडे, कै. अप्पा कानिटकर, पंडित हळदणकर या गुरूंचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. शास्त्रीय संगीताबरोबरच सुगम संगीत, नाट्यसंगीत, उर्दू गझल, ठुमरी, निर्गुणी भजन इत्यादी संगीत प्रकारांचाही त्यांचा अभ्यास आहे. अनेक सांगीतिक विषयांवर त्यांनी व्याख्याने दिली आहेत. संपूर्ण भारतभर आणि भारताबाहेर दुबई, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा इत्यादी ठिकाणी त्यांनी मैफली सादर केल्या आहेत.
रत्नागिरीत होणाऱ्या त्यांच्या पाडवा मैफलीला हार्मोनियम साथ वरद सोहनी (रत्नागिरी) तर तबलासाथ अजित किंबहुने (पुणे) हे नामवंत कलाकार करणार आहेत. ही संगीत मैफल फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने प्रायोजित केली असून मैफल सर्व रसिकांना विनाशुल्क आहे. रसिकांनी मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.
उद्या रत्नागिरीत होणार खल्वायनच्या दिवाळी पाडवा संगीत सभेत मंजिरी कर्वे-आलेगावकर यांचे गायन
