ठाणे:-विधान परिषदेचे माजी उपसभापती स्व. वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ समन्वय प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालय गटात जीवनधारा जायेभाये, तर वरिष्ठ महाविद्यालय गटात श्रुती बोरस्ते यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
समन्वय प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी वक्तृत्व स्पर्धा होणार असून, जास्तीत जास्त तरुणांनी स्पर्धेत भाग घ्यावा. या स्पर्धेत सहभागी मुलांचे विचार प्रगल्भ असल्यामुळे राज्याचे भविष्य उज्वल असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रभावी वक्ते घडतील, अशी आशा आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली.
भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. या स्पर्धेत मुंबई, ठाण्याबरोबरच पालघर, रायगड, पुणे, उस्मानाबाद, नाशिक जिल्ह्यातील २५ महाविद्यालयांतील ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कनिष्ठ महाविद्यालय गटात जीवनधारा जायेभाये हिने प्रथम क्रमांकाचे सात हजार रुपयांचे पहिले बक्षीस पटकावले. द्वितीय क्रमांकावर अलिषा पेडणेकर, अनुष्का गांगल हिला तृतीय आणि वेदांती साखरे हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. वरिष्ठ महाविद्यालय गटात श्रुती बोरस्ते हिने सात हजारांचे प्रथम, प्रतिक पवार व यश पाटील यांना संयुक्तरित्या द्वितीय, संकेत पाटील व सुप्रिम म्हसकर यांना तृतीय आणि विवेक वारभुवन व हर्ष नागवेकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण लेखिका व निरुपणकार वृंदा दाभोळकर, लेखक-दिग्दर्शक-अभिनेते अभिजीत झुंझारराव, लेखक-दिग्दर्शक-अभिनेते विनोद गायकर यांनी केले.
या स्पर्धेत परीक्षेचे वेळापत्रक सांभाळून प्रवासाची कसरत करीत स्पर्धकांनी उत्तम पद्धतीने सादरीकरण केले. त्यानिमित्ताने विविध विषयांवर, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भविष्यावर तरुण पिढीची परखड आणि प्रगतिशील मते मांडली. उत्स्फूर्त फेरीच्या सादरीकरणातही स्पर्धकांचा स्पष्टवक्तेपणा आणि प्रामाणिकपणा दिसून आला. स्पर्धेचे विषय आजच्या काळानुसार व आजच्या पिढीला विचार करायला लावणारे होते, अशा शब्दात परीक्षकांनी कौतुक केले. या स्पर्धेचे नियोजन मोरया इव्हेंट्स अँड इंटरटेनमेंट यांनी केले होते.