दिवाळीपर्यंत कामे पूर्ण करण्याची महामार्ग कंपनीला सूचना
चिपळूण,प्रतिनिधी:-शहरातील शासकीय अधिकाऱ्यांनी आज सकाळी मुंबई गोवा महामार्गाच्या कामा संदर्भातील समस्या जाणून घेण्यासाठी मॉर्निंग सर्वे केला. महामार्गावरील रस्ते, ढासळलेले बांधकाम, अपुरे सेवा रस्ते आणि कोसळलेल्या उड्डाणपुलाची पाहणी केली. नागरिकांच्या दृष्टीने गैरसोय होत असलेली तातडीची कामे दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याची सूचना महामार्ग कंपनीला करण्यात आली आहे. तसेच महत्त्वाचे पण मोठी कामे दिवाळीनंतर तत्काळ सुरू करण्याचे आदेशही या कंपनीला अधिकाऱ्यांनी दिले.
शहरातील बहादूरशेख नाका ते पाग पावर हाऊस पर्यंतच्या मार्गाची अधिकाऱ्यांनी पायी चालून पाहणी केली. चिपळूण शहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला मागील वर्षापासून गती आली आहे. शहरातील सेवा रस्त्याचे काम सुरू आहे, उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, तसेच पाग, गुहागर नाका, बहादूर शेखनाका, प्रांताधिकारी कार्यालय आधी ठिकाणी लहान मोठे सर्कल तयार करण्याचे काम सुरू आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेले गटार पावसाळ्यात मातीने तुंबले आहेत. हे गटार स्वच्छ करण्याच्या सूचना महामार्ग कंपनीला देण्यात आल्या. पावर हाऊस येथे सर्कल उभारण्याचे काम सुरू आहे त्या ठिकाणी वाहनांचे अपघात होत आहे. शहराकडे जाणारा मार्ग सुव्यवस्थित करण्याची सूचना कंपनीला करण्यात आली. गुहागर बायपास मार्ग हा मुंबई गोवा महामार्गाला जोडला जातो. त्या ठिकाणी सूचनाफलक लावण्याची सूचना महामार्ग कंपनीला करण्यात आली. शहराकडे जाणारे सर्व जोड रस्ते डांबरी किंवा सिमेंट काँक्रेटने करण्याची सूचना करण्यात आली. शहरात काही ठिकाणी गतिरोधकची गरज आहे. त्या त्या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची सूचना महामार्ग कंपनीला करण्यात आली. महामार्गाच्या कामात अनेक ठिकाणी किरकोळ चुका आहेत. काही ठिकाणी रस्त्याची उंची कमी जास्त आहे. पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या गटारांची उंची आणि रस्त्याची उंची यामध्ये बरीच तफावत आहे. या सर्व चुका तपासून तातडीने रस्ते दुरुस्तीचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण करण्यात यावे. शहरातील सेवा रस्त्यांचा दर्जा अत्यंत खराब आहे. नागरिकांना अजूनही खड्ड्यातून आणि खडी पसरलेल्या रस्त्यातून जावे लागत आहे. पाऊस संपल्यामुळे महामार्गावर धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यावर उपाययोजना करण्याची सूचना महामार्ग कंपनीला देण्यात आली. सर्कल उभारण्याचे काम तातडीने पूर्ण करा आणि आवश्यक ते सूचनाफलक लावा अशा प्रकारच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
यावेळी प्रांताधिकारी आकाश लीगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने, चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, महावितरणचे अधिकारी कैलास लवेकर व महामार्ग कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबई गोवा महामार्गाच्या कामा संदर्भातील समस्या जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांचा मॉर्निंग सर्व्हे
