सिंधुदुर्ग:-कोकण म्हणजे कलेची आणि कलाकारांची खाण. आजवर असंख्य कलाकार ह्या मातीत तयार झाले. अनेकांनी त्यांची कारकीर्द गाजवली. याच कोकणातल्या मातीतल्या कलाकारांनी एकत्र येत कोकणाचा सांस्कृतिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देश्याने ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ स्थापन करत कोकण चित्रपट महोत्सवाची सुरुवात केली.
पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर यंदाच्या महोत्सवासाठी ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ सज्ज झाला आहे. यंदा या कोकण चित्रपट महोत्सवाचे दुसरे वर्ष असून सोमवार 11 डिसेंबर ते शनिवार 16 डिसेंबर दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे.
11 डिसेंबरला सिंधुदुर्गात महोत्सवाचा शानदार उदघाट्न सोहळा संपन्न होणार असून त्यानंतर मराठी चित्रपटांचे प्रदर्शन होईल. 12 डिसेंबरला रत्नागिरीमध्ये उदघाट्न सोहळा आणि चित्रपटांचे प्रदर्शन होईल. 13 व 14 डिसेंबरला मराठी चित्रपटांचे प्रदर्शन संपन्न होईल. 15 डिसेंबरला सिंधुदुर्गात सेमिनारचे आयोजन करण्यात आले असून या सेमिनार मध्ये कोकणातील मान्यवर कलाकार, वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. 16 डिसेंबरला बक्षिस समारंभ आणि महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न होईल.
या महोत्सवासाठी आपले चित्रपट दाखविण्यास इच्छुक असणाऱ्या चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांनी 5 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर पर्यंत आपले प्रवेश अर्ज kokanchitrapatmahotsav@gmail.com या ई-मेल आयडीवर सादर करायचे आहेत. जानेवारी 2022 ते ऑगस्ट 2023 या वर्षात सेन्सॉर संमत झालेले मराठी चित्रपट यासाठी पात्र असणार आहेत. महोत्सवात सहभागी झालेल्या चित्रपटांच्या स्पर्धेतून सर्वोत्तम चित्रपटाची निवड केली जाईल.
कोकणातल्या मातीत अनेक हरहुन्नरी कलाकार आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने या कलाकारांना चित्रपट माध्यमाशी जोडले जाण्याची संधी मिळते. ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ अशा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ संस्थेचे अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर सांगतात. गेल्यावर्षी या महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून याहीवर्षी उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अधिक माहितीसाठी विजय राणे : 9137837608 यांच्याशी संपर्क साधावा.
11 ते 16 डिसेंबर दरम्यान ‘कोकण चित्रपट महोत्सव’ रंगणार
