देवगड:- देवगडच्या कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर रापण महोत्सव आय़ोजित करण्यात आला होता. नागरिकांनी ताज्या मासळीवर ताव मारीत असताना मच्छी जेवण तसेच शाकाहारी प्रदार्थाचा आस्वाद घेत आपला मनमुराद आनंद लुटला.
रापण म्हणजे काय ? याचे प्रात्यक्षिक देखील पर्यटकांनी पाहिले, अनुभवले. श्री देव कुणकेश्वर चरणी श्रीफळ अर्पण करून मान्यवर अतिथी आयोजक यांच्या उपस्थितीत या रापण महोत्सवाची सुरुवात शनिवारी दु.3 वाजता कुणकेश्वर बिच येथे करण्यात आली.
देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था अध्यक्ष प्रमोद नलावडे, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे, माजी ग्राम सरपंच गोविंद घाडी, प्रभारि सरपंच शशिकांत लब्दे, ग्रामसेवक गुणवंत पाटील, देवगड व्यापारी संघ अध्यक्ष शैलेश कदम , कुणकेश्वर, कातवण, रापण संघ, प्रतिनिधी, बचत गट प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत या महोत्सवास सुरुवात झाली.
देवगड तालुका व्यापारी पर्यटन समिती(देवगड), श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत कुणकेश्वर, कुणकेश्वर – कातवण रापण संघ’, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅक यांच्या सहकार्यातून रापण महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले होते. कुणकेश्वर बीच येथे 4 आणि 5 नोव्हेंबर शनिवार व रविवार या दोन दिवशी सायंकाळी 3 ते 10 या वेळेत करण्यात आले असून रापण प्रात्यक्षिक पहाण्यास पर्यटक नागरीक यांनी गर्दी केली आहे. .
मासे पकडण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यात रापणीची मासेमारी म्हणजे एक संस्थानच! त्याचा रुबाब, त्याची अदब, सारेच आगळे आणि वेगळे! अलीकडे रापणीची ही संस्कृती कोकणच्या किनाऱ्यावरून अस्तंगत होत आहे. म्हणूनच या संस्कृतीच्या वेगळेपणापासून ते अर्थकारणापर्यंत आणि गीतांपासून नियमांपर्यंत अशा सर्व बाजूंची ओळख करुन देणारा महोत्सव म्हणजे ‘रापण मोहोत्सव – 2023’ चे आयोजन कुणकेश्वर येथे करण्यात आले आहे.
या महोत्सवाची वैशिष्ट्ये
स्थानिक मच्छीमारांसोबत मासे पकडण्याचा अनुभव, रापण ओढायचा आनंद, रापणीच्या जाळ्यात सापडलेले ताजे मासे वेचने व त्या मिळालेल्या ताज्या माश्यांचे विविध पदार्थ चवीने चाखण्यासाठी कुणकेश्वरच्या सागर किनारी आवर्जून यावे. त्याच बरोबर कोकणी पद्धतीचे शाकाहारी जेवण , उकडीचे मोदक, अळूवडी हे पदार्थ चाखावयास मिळणार आहेत. ‘रापणमहोत्सव 2023’ ला ‘कुणकेश्वर’ मध्ये रापणी चा आगळा वेगळा आनंद अनुभवायला.पर्यटकांनी मोठया प्रमाणात यावे असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.
देवगडच्या कुणकेश्वर समुद्र किनाऱ्यावर रंगला रापण महोत्सव
