रत्नागिरी:-जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प येणार आहे. यामुळे तरुणांच्या हाताला काम आणि बेरोजगारिचा प्रश्न किंचितसा सुटणार आहे. एप्रिल एशिया कंपनी असे रत्नागिरीत होऊ घातलेल्या प्रकल्पचे नाव आहे. उच्च दर्जाचे टिश्यू बनवणारी ही सिंगापूरमधील कंपनी आहे. हे टिश्यू कंपनी निर्यात करते. त्यासाठी किनारपट्टी भागात सुमारे दोन हजार एकर जागा कंपनीला अपेक्षित असून, १० हजार कोटीची गुंतवणूक करण्यास तयार आहे. यामुळे रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नवीन उद्योग येण्यास इच्छुक आहेत. त्यामध्ये कोकाकोला कंपनी, रेल्वेडबे बनवणारा कारखाना, पेपर मिल आदी कारखाने प्रस्तावित आहेत. या कारखान्यांमुळे जिल्ह्याच्या उद्योगक्षेत्रामध्ये चांगली भर पडणार आहे.
कच्चा माल आणण्यास सोपे जात असल्याने जिल्ह्याच्या समुद्र किनारपट्टीजवळच्या जागांना मोठी मागणी आहे. जिल्ह्यातील सहाही एमआयडीसींमधील जागा शिल्लक नसल्याने नव्या उद्योगांसाठी ही एक अडचण निर्माण झाली आहे; परंतु काही नव्या एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्या अनुषंगाने नवे उद्योग येण्यास तयार झाले आहेत.
नवे उद्योग यावे यासाठी स्टर्लाईटची मोठी जागा एमआयडीसीला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत तसेच जेके फाइल्सच्या जागेतही नवा उद्योग आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. उद्योगांना सहज गुंतवणूक करता यावी यासाठी राज्य शासनानेही आपले उद्योग धोरण बदलून त्यामध्ये गतिमानता आणली आहे.
त्यामुळे सिंगापूरची एप्रिल एशिया कंपनी जिल्ह्यात १० हजार कोटींची गुंतवणूक करण्यास तयार झाली आहे. हे टिश्यू विमानात व अन्य ठिकाणी वापरले जातात. हे टिश्यू निर्यात केले जाणार असल्याने बंदराच्या ठिकाणी जागा मिळाल्यास त्याला कंपनी अधिक प्राधान्य देणार आहे.