संबंधितांचे अधिकाऱ्यांशी साटलोट असण्याची शक्यता
प्लॅन नुसारच काम झाले पाहिजे अन्यथा, खड्ड्यात आत्मदहन करण्याचा इशारा
रत्नागिरी/ प्रतिनिधी:-हातखंबा तिठ्यावरील सोहम जिम फिटनेस या ठिकाणी स्थानीक लोकांची वस्ती आहे. थेट घराच्या समोर भला मोठा खड्डा खोदाई करून घराकडे येण्या-जाण्याचे मार्ग बंद करण्याचा घाट प्राधिकरण विभागाने घातला आहे. चुकीच्या पद्धतीने खोदाई करण्यात आलेल्या मोरीच्या खड्ड्याला स्थानीक ग्रामस्थ कपिलानंद कांबळे यांनी विरोध दर्शवला आहे. तत्काळ याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रोजेक्ट डायरेक्टर यांना लेखी निवेदन पाठवले आहे. तसेच घरासमोरील मोरी हटवली नाही तर उपोषण छेडण्याची आक्रमक भूमिका ही घेतली आहे.
या विषयासंदर्भात महामार्ग प्राधिकरण विभागाची टेकनिकल टीमचे अधिकारी सोमवारी (दिनांक ३० ऑक्टोबर २०२३) दुपारी बारा वाजता स्पॉटवर येऊन स्थानिक रहिवाशांची चर्चा केली. या चर्चेत स्थानिक नागरिक कांबळे यांनी घराच्या समोरील मोरीसंदर्भात, पावसाचे पाणी, आणि घरांकडे ये-जा करण्यासाठीं रस्त्यांबाबत असे महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. यामध्ये प्रोजेक्ट प्लॅनिंगनुसार जिथे पहिला मोरीसाठी खड्डा खोदून कॉक्रीटीकरण केले. त्या ठिकाणाहून थेट ५० ते ६० मीटरवर खड्डा सरकवून घरासमोर व चढणीच्या दिशेवर खड्डा खोदाई का केला? या मोरीमुळे आमचे मार्गच बंद होणार आहेत असे अनेक प्रश्न स्थानीकांनी उपस्थित केले. त्यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोरी एका जागेवरून दुसऱ्या जागी बदल करण्याचा अधिकार आम्हाला आहे. त्यामुळे घरासमोर खड्डा खोदाई करण्यात आला आहे. तसेच स्थानिकांच्या घराकडे येण्या-जाण्यासाठीचा मार्ग हा वापरात नसलेल्या रोडवरून देण्यात येईल. यासोबत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी त्याच रोडवरून खोदाई करून दोन वेगवेगळ्या ठिकाणीं जवळच पाईप टाकून पाणी मोरीच्या मुखात सोडण्यात येईल असे टेकनिकल टिमचे इंजिनीयर ललित यांनी सांगितले.
थेट प्रोजेक्ट प्लॅन बदलून घरासमोरच मोरी बांधण्याचा घाट
या चर्चेदरम्यान स्थानिक रहिवाशी व टेकनिकल टीमचे दोन अधिकारी उपस्थित होते. चर्चेतून समाधान न होता अधिकाऱ्यांनी अनेक संभ्रम निर्माण केले आहेत. मुळात या भागातील जमिनीची उतरती दिशा लक्षात घेऊन जुनी मोरी ही रद्द करण्यात आली. याच जुन्या मोरीचे पाणी तिथूनच पुढे काढून प्रोजेक्ट प्लॅनिंग नुसार जो पहिला खड्डा खोदाई केला तेथील मोरीच्या मुखात जाणार आहे. परंतु प्राधिकरण विभागाच्या टेकनिकल टिमच्या इंजिनीयरने याठिकाणी अनोखी शक्कल लढवली. प्रोजेक्ट प्लॅननुसार काम न करता महामार्गामध्ये जमीन गेलेल्या जागेमालकाच्या सांगण्यावरून मोरीचा प्लॅन बदलल्याचे दिसून येत आहे. प्लॅन बदलून थेट घरासमोर मोरीचा खड्डा खोदून मोरी उभारण्याचा घाट इंजिनीयर व अधिकारी घालत आहेत. हे सर्व कामकाज भविष्यात स्थनिकांच्या मुळावर उठणार असल्याने याला स्थानिकांनी ठाम विरोध दर्शवला आहे. महामार्गाचा रस्ता काही फुटाच्या उंचीवरून होत असल्याने घरांकडे येण्या-जाण्याचे मार्ग बंद होणार हे नीच्छित आहे. तसेच मोरीचा प्लॅन बदलून थेट घरासमोरच मोरी उभारण्याचे नेमके अधिकाऱ्यांचे कोणते नियोजन? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या विषयात संबंधितांचे अधिकाऱ्यांशी साटलोट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानीक दक्ष नागरिक कांबळे यांनी आता आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
प्लॅननुसारच काम करा, अन्यथा घरासमोरील पाडलेल्या खड्ड्यात आत्मदहन करण्याचा इशारा
या ठिकाणचे काम प्रोजेक्ट प्लॅनिंग नुसारच झाले पाहिजे. घराच्या समोरचा भला मोठा मोरीचा खड्डा बुजवून प्लॅननुसार पूर्वनियोजित पहिल्या खड्ड्यातच मोरीचे बांधकाम करावे. याबाबत निर्णय तातडीने वरिष्ठ व स्थानिक अधिकाऱ्यांनी घ्यावा. अन्यथा खड्ड्यातच उपोषण सुरू करावे लागेल, वेळ पडली तर घरासमोर खोदाई केलेल्या खड्ड्यात आत्मदहन करेन याला सर्वस्वी जबाबदार टेकनिकल इंजिनीयर, प्रशासनाचे व महामार्गाचे अधिकारी असतील असा इशारा स्थानिक ग्रामस्थ कांबळे यांनी प्राधिकरण विभागाला दिला आहे. याबाबत महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रोजेक्ट डायरेक्टर, जिल्हाधिकारी देवेंदर सिंग, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांना लेखी निवेदन कांबळे यांनी पाठविले आहे.
थेट प्लॅन बदलून अधिकारी करतायत घरासमोर मोरीचे लचांड; स्थानिकांचा आक्रमक पवित्रा
