रत्नागिरी:- कृषी पायाभूत सुविधा योजनेत सहभागी होऊन रु. 2 कोटीपर्यंत तारण विरहित कर्ज व 3 टक्के व्याज परतावा असा दुहेरी लाभ मिळवावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले.
येथील अंबर मंगल कार्यालय स्मार्ट प्रकल्पांतर्गत विभागस्तरीय उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलन ( Tech Market Meet ) आयोजित करण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बा. सा. को. कृ. विद्यापीठ, दापोलीचे संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे व माजी आमदार तथा देवगड तालुका आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष अजित गोगटे हे होते.
यावेळी विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी स्मार्ट प्रकलपाच्या माध्यमातून निवड झालेल्या समूह संस्थांनी काढणी पश्चात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीचे उप प्रकल्प सादर करून भागधारक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा. प्रकल्पाचा सुमारे तीन वर्षाचा कालावधी शिल्लक राहिला असल्यामुळे प्रकल्प आराखडा तयार करून मान्यता घेणे, जागतिक बँकेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संपादन प्रक्रिया राबवून प्रकल्प उभारणी करून तॊ कार्यान्वित करण्यासाठी समयबध्यरित्या काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. स्मार्टमध्ये सहभागी समूह संस्थानी जैविक शेती मिशनमध्ये देखील सहभागी होऊन भागधारक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा तसेच कृषी पायाभूत सुविधा योजनेत सहभागी होऊन रु. 2 कोटीपर्यंत तारण विरहित कर्ज व 3 टक्के व्याज परतावा, असा दुहेरी लाभ मिळवावा, असे आवाहन केले. तसेच कोकण विभागातील 6 कृषी उत्पादनासाठी भोगोलिक मानांकन( GI ) नोंदणी प्राप्त झाली असून त्याच्या वापरकर्ता संख्या वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असल्याचेही सांगितले.
संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे यांनी कृषी विद्यापिठातील संशोधन शेतकऱ्यांपर्यत पोहचविण्यासाठी कृषी विभाग व कृषी विद्यापीठ एकत्रितपणे प्रयत्नशील राहतील, असे सांगितले.
माजी आमदार श्री. गोगटे यांनी कोकणातील जमीन व हवामान फळपिकांच्या लागवडीस पोषक असून, त्याचा लाभ घेऊन निर्यातक्षम उत्पादन घ्यावे, असे सांगून कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषी प्रक्रिया योजनाबाबत मार्गदर्शन केले.
पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक मिलिंद जोशी, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकुंद खांडेकर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक मंगेश कुलकर्णी आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
या संमेलनाच्या निमित्ताने आंबा मूल्य साखळीतील सर्व घटक उदा. उत्पादकांच्या समूह आधारीत संस्था ( CBO ), खरेदीदार,प्रक्रियादार, निर्यातदार, निविष्ठा पुरवठादार, बँक, शास्त्रज्ञ्, संलग्न विभागाचे अधिकारी इत्यादी एकाच व्यासपीठावर एकत्रित येऊन चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक को. वि. ठाणेचे नोडल अधिकारी भिमाशंकर पाटील यांनी केले तर आभार नोडल अधिकारी अजय शेंडे यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मूल्यसाखळी विकास तज्ज्ञ संदीप गोर्डे यांनी केले.