मंडणगड:-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंबडवे (ता. मंडणगड) हे मूळ गाव आता मुंबई- गोवा महामार्गाला जोडले जाणार आहे.
अनेक वर्षे डॉ. आंबेडकर यांचे हे गाव सर्वसामान्यांपासून थोडे अलिप्तच राहिले आहे.
या गावात होणाऱ्या दुपदरीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाल्याने आता हे गावही महामार्गाला जोडले जाणार आहे. यामुळे हे गाव ऐतिहासिक व पर्यटनाच्या दृष्टीने मुख्य प्रवाहात येणार असून डॉ. आंबेडकर यांच्या असंख्य अनुयायांनी आनंद व्यक्त केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटनाच्या वरदानासोबत अनेक गावांमध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. यापैकीच अनेक वर्षे प्रकाशझोतापासून दूर राहिलेले आणि अनन्यसाधारण ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले गाव म्हणजे मंडणगड तालुक्यातील आंबडवे गाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव म्हणून ओळखले जाते. आता हे गाव मुख्य प्रवाहात येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात राजेवाडी गावाजवळ मुंबई-गोवा महामार्गापासून पुढे म्हाप्रळ, रत्नागिरी तालुक्यातील मंडणगड शहर आणि मंडणगड तालुक्यातील आंबडवे गाव (रस्त्याचे नाव ९६५ डीडी) अशा तब्बल ६९ किलोमीटरच्या रस्त्याच्या दुपदरीकरणासाठी मंजुरी मिळाली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे गाव मुंबई गोवा महामार्गाला जोडणार
