गुहागर:- अपारंपरिक ऊर्जा संसाधनांसाठी जिल्हा नियोजनमधील राखीव निधीतून रत्नागिरी तालुक्यातील गोळप पाठोपाठ गुहागर तालुक्यात जिल्ह्यातील दुसरा १ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
त्यासाठी वरवेली येथील जागेचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर त्यावर कार्यवाही केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी आठ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वरवेली आणि गोळप येथील सौर प्रकल्प कार्यान्वित झाले तर पथदीपामुळे येणाऱ्या वीजबिलात ४० टक्के बचत होणार आहे.
गुहागर वरवेली येथे होणारा जिल्ह्यातील हा दुसरा प्रकल्प आहे. सुमारे नऊ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे तसेच तांत्रिक मंजुरीसाठी अपारंपरिक ऊर्जा विभागाकडे पाठवला आहे. या प्रकल्पातील तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी महावितरण आणि जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकार्यांची काही दिवसांपूर्वी चर्चाही झाली. सौर प्रकल्पाद्वारे निर्माण होणारी वीज महावितरणला दिली जाते. त्यासाठी तिथे डीपी उभारावा लागतो. वरवेली येथे सोयीस्कर जागा शोधण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पहिला प्रकल्प रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे होत असून त्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. त्यासाठी सुमारे सात कोटी रुपयांचा खर्च आला आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यामधून वीजनिर्मिती केली जाईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी महावितरणला पत्र
वरवेली येथील प्रकल्पातील वीज शृंगारतळी येथील उपकेंद्राला जोडण्यात येणार आहे; परंतु या उपकेंद्रातील सौरऊर्जा प्रकल्पासाठी क्षमता नसल्याबाबतचे महाऊर्जा कार्यालयामार्फत कळवले होते. हा प्रकल्प महत्वाकांक्षी असल्यामुळे शृंगारतळी उपकेंद्राची क्षमता वाढवण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी जिल्हा परिषदेकडून महावितरणला पत्र सादर करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील पथदीपांच्या वीजबिलावरील खर्च कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेने सौरप्रकल्प उभारण्यावर भर दिला आहे. त्यामुळे वीजबिलावरील खर्चात बचत होणार आहे. गोळप येथील प्रकल्पाचे काम सुरू असून, वरवेलीतील प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
– कीर्तीकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी