महाराष्ट्रातही परिणाम
नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर दिल्लीच्या बाजारात कांद्याचे भाव कमी घसरायला लागले आहेत. दिल्लीच्या ओखला मंडईत बुधवारी कांद्याची किरकोळ किंमत 25 टक्क्यांनी घसरून 56 ते 60 रुपये प्रतिकिलो झाला.
महाराष्ट्रातील बाजारपेठेतही कांद्याचे भाव कोसळू लागले आहेत. मात्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशसारख्या अनेक राज्यांमध्ये कांद्याचे दर चढेच आहेत. येत्या काही दिवसांत कांद्याचा नवा साठा बाजारपेठेत येण्याची शक्यता असल्याने भाव आणखी कमी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
गेल्या आठवड्यात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. देशातील काही राज्यांमध्ये 24 ते 25 ऑक्टोबर दरम्यान कांद्याचे भाव अचानक वाढू लागले आणि दोन दिवसांत 80 रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. यानंतर केंद्र सरकारने हस्तक्षेपानंतर आज कांद्याचे दर 60 रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. येत्या काही दिवसांत हे दर किलोमागे 50 रुपयांपर्यंत कमी होतील. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळेल, असे दिल्लीतील कांदा व्यापाऱ्याने सांगितले.
गेल्या आठवड्यात कांद्याचा भाव 80 रुपये किलोवर पोहोचल्यानंतर त्याचा कांदा व्यवसायावर विपरीत परिणाम झाला होता. आता नवीन साठा बाजारात आल्यावर आगामी काळात भाव आणखी कमी होतील, अशी आशा कांदा व्यापाऱ्यांना आहे.
अन्न मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील बाजारपेठेतही कांद्याचे भाव कमी होऊ लागले आहेत. मात्र, राजस्थानच्या बाजारपेठेत कांद्याचे दर चढेच आहेत. जयपूरच्या मुहाना भागात कांद्याचा किरकोळ दर 80 रुपये किलो आहे. मध्य प्रदेशातील बारवानीमध्येही कांद्याचा भाव 70 रुपये किलोवर कायम आहे, तर विदिशामध्येही कांदा 60 ते 70 रुपये किलोने विकला जात आहे.
विदिशा परिसरातील छोट्या व्यापाऱ्यांनी घाऊक विक्रेत्यांवर कांद्याचा काळाबाजार केल्याचा आरोप केला आहे. घाऊक विक्रेते शेतकऱ्यांकडून कांदा बाजारात आणण्यात होणारा विलंब हे भाव वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे सांगत आहेत.