जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवात
नवी मुंबई:-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारच्या निर्णयानुसार राज्यात मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार, धाराशिव जिल्ह्यातील सुमित माने नामक मराठा तरुणाला कुणबी मराठा जातीचे पहिले प्रमाणपत्र मिळाले आहे.Maratha Reservation
राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत न्यायमूर्ती शिंदे समितीच्या (सेवानिवृत्त) प्राथमिक अहवालाला मंजुरी दिली. त्यानंतर लगेचच सरकारने वंशावळीत कुणबी उल्लेख असणाऱ्या मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी जातप्रमाणपत्र (Maratha Reservation)देण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार, आता या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओम्बसे यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. 30 वर्षीय सुमित बीसीए पदवीधर आहेत. ते शेती करतात. त्यांना 2 भाऊ आहेत. त्यांच्या एका भावाने कृषी विषयात एमबीए केले आहे.
कोणत्या आधारावर प्रमाणपत्र?
सुमित माने या लाभार्थी तरुणाचे पणजोबा कृष्णा दादा माने यांच्या 1917 च्या ‘गाव नमुना 14’ वर कुणबी म्हणून नोंद आढळली आहे. या पुराव्याच्या आधारावर सुमित यांना मराठा कुणबी म्हणून जात प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
महसूल प्रशासनानेच हा पुरावा शोधला आहे. या प्रकरणी प्रशासनाने धाराशिव जिल्ह्यात सुमारे 40 लाख कागदपत्रांची पडताळणी केली. त्यात 459 प्रकरणांत मराठा कुणबी पुरावे आढळून आले.