गुहागरमध्ये जिल्हा क्षत्रिय मराठा समाजाचा एकमुखी ठराव
गुहागर:- आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगेपाटील यांच्या आंदोलनाला रत्नागिरी जिल्हा क्षत्रिय मराठा समाजाचा पाठिंबा आहे. मात्र, आम्हाला कुणबी मराठा असे प्रमाणपत्र नको, मराठा म्हणूनच आरक्षण मिळावे, अशी आमची मागणी असून पुढाऱ्यांना बंदी करणार नाही, असा एकमुखी ठराव झाल्याची माहिती मराठा समाजाचे प्रतिनिधी राजन घाग व सुधीर भोसले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील शांताई रिसाँर्ट येथे रविवारी रत्नागिरी जिल्ह्यातील क्षत्रिय मराठा समाजाच्या मुख्य प्रतिनिधींची बैठक झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. सुरुवातीला गुहागरचे अँड. संकेत घाग यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली. यानंतर मराठा प्रतिनिधी राजन घाग यांनी बैठकीतील निर्णय सांगितले. आमचा मराठा समाज उन्नत व प्रगत कसा होईल आणि तो वेगळ्या दिशेने कसा मार्ग करेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी आम्ही संघटना बांधत आहोत. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र नको, अशी आमची ठाम भूमिका आहे मात्र, मराठा हेच आम्हाला प्रमाणपत्र मिळावे व कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण सरकारने द्यावे, अशी आमची आग्रही मागणी आहे. कुणाचेही सरकार असो, आम्हाला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. केवळ आरक्षण हवे.
आम्ही कुठल्याही प्रकारे हिंसेचे समर्थन करणार नाही पण न्यायाने, संविधानाने आम्हाला मिळावे यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू आणि सरकारकडून आरक्षण घेऊ. आज हा सकल मराठा समाज रत्नागिरी, चिपळूणमधून बोलतोय मात्र, त्यांना मुंबईत यायला वेळ लागणार नाही. मुंबई तर याच्यात ठरलं तर लाखोंच्या संख्येने हे लोक मुंबई धडकतील त्याआधी सरकारने निर्णय घ्यावा अशी अशी आमची सर्वांच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे. आम्ही एक नागरिक म्हणून जसं संविधानातर्फे प्रत्येक नागरिकाला आरक्षणाचा अधिकार आहे. जर तो समाज शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असेल तर त्याला आरक्षण मिळालेच पाहिजे असं संविधान म्हणतोय. आम्ही तीच भूमिका मांडतोय. ही भूमिका आमची गेली 40 वर्षे आहे अण्णासाहेब पाटलांनी जे बलिदान दिलेले आहे म्हणजे 1982 साली तेव्हापासूनचे आम्ही मागणी आहे. आमची मराठा आरक्षण म्हणून आंदोलनाची भूमिका असेल कारण या सरकारला विनंती करून किंवा बैठका घेऊन मागण्या मान्य करण्याचे दिसत नाही पण आम्ही संविधानिकरित्या आंदोलन करूच करू. पूर्ण मराठा समाज ज्यावेळी एकवटतो त्यावेळेला काय होतं ते या सरकारला आणि या सरकारमधील पक्षाला कळेल, असेही घाग यांनी स्पष्ट केले.
आमची मागणी वैध्यरित्या असेल तर कुणबी समाजही आमच्या पाठी तेवढ्याच ताकदीने उभा राहील. जी मागणी आमची आहे ती पहिल्यापासून कायम आहे. कुणबी बांधव व मराठा बांधव गाव पातळ्यांवर एकत्र गुण्यागोविंदाने नांदत आहेत. विनाकारण जातीयता भडकावून कोण त्याचा राजकीय हेतू साध्य करत असेल तर ते आम्ही कदापी सहन करणार नाही, असे मराठा प्रतिनिधी सुधीर भोसले यांनी ठणकावून सांगितले. तसेच पुढाऱ्यांच्या गावबंदीचा निर्णय आम्ही घेतलेला नाही. कारण येथील जे काही राजकीय लोक आहेत ते आमच्या समाजातलेच आहेत आणि त्यांचा कायम समाजाच्या बाजूने किंवा इतर सगळ्या गोष्टींच्या बाबतीत पाठिंबा असतो. त्यांचे सहकार्य असते त्यामुळे उगाचच कुठल्यातरी भूमिका घेऊन त्यांना विरोध करणे हे चुकीचे आहे. आमच्या भूमिका स्पष्ट आहेत. ज्यांना राजकारण करायचे त्यांना करू द्या, आमच्या संघटनेची भूमिका ही केवळ मराठा आरक्षणासाठीच असेल असेही शेवटी भोसले यांनी स्पष्ट केले.
यावेळी राकेश नलावडे, संतोष तावडे, कौस्तुभ सावंत, अँड. कार्तिकी शिंदे, अँड. राहूल राणे, सुभाष राणे, संतोष सावंत, शरद चव्हाण, अजित साळवी, राजेश कदम, पप्या चव्हाण, विनय जाधव, सुरेश राणे, सुनील दळवी, गणेश खामकर, तानाजी सावंत, विलास मोरे, मनिष सावंत, अँड. पूनम चव्हाण यांसह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मराठा प्रतिनिधी उपस्थित होते.
सरकारला गंभीर इशारा
मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर हा समाज एक मोठा निर्णय घेईल की जे सरकार आरक्षण देईल त्याच्याच पाठी उभे राहू त्याची सर्वांनी दखल घ्यावी. अन्यथा येणारा निवडणुकीत सरकारला व सर्वच राजकीय पक्षांना याचे परिणाम भोगावे लागतील. सरकारचे काय होईल याची आम्ही गॅरंटी देणार नाही, असा गंभीर इशारा देण्यात आला.