२५ मोकाट गुरांना शेतकऱ्याकडून मागणी
रत्नागिरी:-पालिकेने पकडलेल्या मोकाट गुरांपैकी दोन दिवसात २५ गुरे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. त्या दृष्टीने बॉण्ड करून या गुरांना रितसर त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. आतापर्यंत गुरांच्या चाऱ्यावर पालिकेचा ४५ हजार रुपये खर्च झाला आहे. गुरांच्या देखभालीसाठी सकाळी २ आणि संध्याकाळी २ असे पाळीने २ कर्मचारी राबत आहेत. पालिकेच्या गळ्यात हे फुकटचे घोंगडे पडल्याची प्रतिक्रिया येत आहे.
शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न अधिक जटील झाला होता. त्यासाठी शहरात मुख्य रस्ता, अंतर्गत रस्त्यावर गुरांच्या झुंडीच्या झुंडी फिरताना किंवा ठिय्या मांडून बसलेले दिसत होते. त्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी होऊन अनेकवेळा ही मोकाट गुरे उधळल्यामुळे अपघात झाले आहेत. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या. पालिका, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनापर्यंत या तक्रारी गेल्यानंतर यावर एक बैठक घेऊन मोकाट गुरांना पकडण्यासाठी कोंडवाडा नसल्यामुळे चंपक मैदानात बंदिस्त शेड मारून या गुरांना तेथे ठेवण्याचा निर्णय झाला. याची सर्व जबाबदारी पालिकेवर टाकण्यात आली. पालिकेने गेल्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये सुमारे ६४ गुरे पकडून या निवाराशेडमध्ये ठेवली आहेत. तिथेच त्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था केली आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची वारंवार तपासणी होत आहे.
बेपर्वा मोकाट गुरांचे मालक सापडल्यास त्यांच्यावर दंडात्मक किंवा फौजदारी कारवाईचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे कोणीही पुढे आले नाही. अखेर पालिकेने शेतकऱ्यांना पाळण्यासाठी मोफत गुरे देण्याचे आवाहन केले; मात्र त्यासाठी रितसर बॉण्ड घेऊन त्याच्या ताब्यात ही गुरे दिली जात आहेत. १२ गुरे आतापर्यंत शेतकऱ्यांनी नेली आहेत. आता ५२ गुरे या निवारा शेडमध्ये आहेत. आणखी दोन शेतकऱ्यांनी प्रत्येकी ११ आणि १२ अशा गुरांची मागणी केली आहे. त्यासाठी बॉण्ड घेण्यापासूनची अन्य प्रक्रिया सुरू आहे. ती झाली की २३ गुरे दोन शेतकऱ्यांना सांभाळण्यासाठी देण्यात येणार आहेत.