मुंबई:-उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत ही माहिती दिली. आजित पवार गेल्या दोन दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नसल्याने पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली होती.या चर्चांना उत्तर देताना प्रफुल्ल पटेलांनी हे ट्वीट केले आहे.
ट्विटमध्ये पटेल यांनी म्हटले आहे की, अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहत नसल्याच्या बातम्या देत प्रसारमाध्यमांकडून काही अंदाज वर्तवले जात आहेत. मात्र मी हे स्पष्ट करू इच्छितो की कालच अजितदादांना डेंग्यूचे निदान झाले आहे.
पुढील काही दिवस त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे ते सार्वजनिक कार्यक्रमांत पुढील काही दिवस दिसणार नाहीत.
तसेच, अजित पवार हे त्यांच्या जनसेवेच्या जबाबदाऱ्यांसाठी कटिबद्ध आहेत. ते डेंग्यूतून पूर्ण बरे झाले की, ते पुन्हा पूर्ण शक्तीने सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये परततील, असे पटेल यांनी पुढे म्हटले आहे.