पीएमइजीपी, सीएमइजीपी,उद्योग विभागाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून इतिहास घडवा-उद्योग मंत्री उदय सामंत
रत्नागिरी:- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, अधिकाऱ्यांनी तळगळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करुन राज्यात इतिहास घडवा. उद्योग विभागाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी योगदान द्या, असे आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.
येथील सावंत पॅलेस हॉटेल मधील सभागृहात राज्यातील सर्व विभागीय अधिकारी व महाव्यवस्थापक यांच्या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन उद्योग मंत्री सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह, अतिरिक्त विकास आयुक्त शनमुगराजन एस, उद्योग सहसचिव संजय देगावकर, अतिरिक्त उद्योग संचालक संजय कोरबू, उद्योग सहसंचालक विजू सिरसाठ आदी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर परिषदेत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, नोकरीत येण्यापूर्वी प्रत्येकांने केलेला संघर्ष सातत्यांने डोळ्यासमोर ठेवून कामकाज करावे. जनतेशी चांगला संवाद ठेवावा. चांगला जनसंपर्क ठेवावा. उद्योग जगतातून अधिकाधिक उद्योजक घडविल्याचे अधिकाऱ्यांनी जनतेपर्यंत जावून सांगावे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून उद्योग विभागाच्या योजना जनतेपर्यंत पोहचवाव्यात. ग्रामसेवक, तलाठी अशांच्याही कार्यशाळा घेऊन उद्योग निर्माण करणाऱ्या योजना लोकांपर्यंत पोहचवाव्यात.
३५ टक्के शासनाची आणि ५ टक्के कर्जदाराची अशी ४० टक्क्यांची हमी देत असतानाही, कर्ज प्रकरणे मंजूर होण्यासाठी बँकावर आदरयुक्त भीती असायला हवी. या कार्यशाळेतून काहीतरी घेऊन जाताना ते वर्षभरात कामातून दिसलं पाहिजे, अशी अपेक्षाही उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी बोलून दाखविली.
विकास आयुक्त श्री. कुशवाह म्हणाले, उद्योग विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी या कार्यशाळेचा निश्चित उपयोग होईल. मैत्री कायद्याचा फायदा उद्योजकांना होत आहे. सेवा हमी कायद्याप्रमाणे ७ हजार ९१३ अर्जदारांना वेळेत सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. नव्या पॉलिसीचे ड्राफ्ट करण्यात येत असून, उद्योग विभागामार्फत दहा सुत्री कार्यक्रम घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उद्योग सहसंचालक श्रीमती सिरसाठ यांनी केले.