वेत्ये किनाऱ्यावर सापडले पहिले घरटे
राजापूर:- कोकण किनारपट्टीवर सागरी कासव विणीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या हंगामातील पहिले घरटे दि. २६ ऑक्टोबर रोजी राजापूर तालुक्यातील वेत्ये किनाऱ्यावर सापडले.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमधील काही किनाऱ्यांवर दरवर्षी समुद्री कासवांमधील ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. मात्र, यंदाच्या कासव विणीच्या हंगामातील पहिले घरटे ऑक्टोबर महिन्यामध्येच सापडले आहे. वन विभागाच्या नोंदीनुसार रायगड जिल्ह्यातील ४, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी १४ किनाऱ्यांवर कासवांची विण होते.
राजापूर तालुक्यातील वडातिवरे, वेत्ये आणि आंबोळगडचा किनारा सागरी कासवांच्या विणीसाठी प्रसिद्ध आहे. गेल्यावर्षी या किनाऱ्यावर कासवांची ९ घरटी मिळाली होती. याच किनाऱ्यावर दि. २६ ऑक्टोबर रोजी कासवमित्र गोकुळ जाधव यांना कासवाचे पहिले घरटे सापडले.
कोकण किनारपट्टीवरील यंदाच्या सागरी कासव विणीच्या हंगामातील हे पहिलेच घरटे आहे. या घरट्यामध्ये जाधव यांना ११५ अंडी सापडली आहेत. या अंड्यांचे संरक्षण त्यांनी किनाऱ्यावरील हॅचरीमध्ये केले आहे.
अंडी व घरट्याची जपणूक
समुद्राच्या भरतीमुळे कासवांनी वाळूमध्ये केलेल्या घरटयाना धोका उद्भवतो. त्यामुळे अंडी देऊन मादी कासव परतल्यानंतर कासव मित्रांकडून ही अंडी टोपलीत सुरक्षितरीत्या ठेवली जातात. भरतीरेषेपासून दूर कृत्रिम घरटय़ांची निर्मिती करण्यासाठी उबवणी केंद्र तयार केले जाते. त्याला हॅचरी म्हणतात. या हॅचरीत मादी कासवाने केलेल्या खड्ड्याप्रमाणे कृत्रिम खड्डा तयार केला जातो. त्यामध्ये ही अंडी ठेवून त्यावर वाळू टाकून खड्डा भरला जातो. त्याभोवती कुंपण तयार केले जाते. अंडय़ांमधून बाहेर पडलेली पिल्ले इतरत्र भटकू नयेत म्हणून त्यावर जाळीदार टोपले ठेवले जाते.