रत्नागिरी : दरमहा किमान वेतन, ऑनलाईन कामाची सक्ती नको, दिवाळी व भाऊबीज भेटीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तक यांनी सुरू केलेल्याची संपाची दखल राज्यस्तरावरून घेत नसल्यामुळे संघटना आक्रमक झाली आहे. कामबंद पाठोपाठ आता शुक्रवारी (ता. २७) जिल्हाधिकारी कार्यालयापुढे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेकडो आशा जिल्हा परिषदेत एकवटल्या. तिथून त्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. गेली अनेक वर्षे आशा व गटप्रवर्तक महिला आपल्या विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करत आहेत.
पुन्हा एकदा मागण्यांसाठी एल्गार केला आहे. १७ ऑक्टोबरला जिल्हा परिषदेवर मोर्चा काढत १८ ऑक्टोबरपासून बेमुदत कामबंद संप करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार हा संप सुरू झाला आहे. सोमवारी यावर तोडगा न निघाल्यामुळे सलग सहा दिवस हा संप सुरूच आहे. याचा परिणाम थोड्या ओके फार प्रमाणात ग्रामीण भागातील आरोग्ययंत्रणेवर जाणवू लागला आहे. आशा व गटप्रवर्तक महिलांना दरमहा २६ हजार रुपये किमान वेतन, गटप्रवर्तक महिलांना दरमहा ८ हजार ४५० रुपये, स्वतंत्र प्रवास भत्ता, ऑनलाईन कामाची सक्ती करणे बंद करा, दिवाळीपूर्वी सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना किमान ५ हजार रुपये दिवाळी भाऊबीज द्या, अशा प्रमुख मागण्या आहेत.
राज्यातील ७० हजार आशा व गटप्रवर्तक महिला संपात सहभागी झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी उपसचिवांबरोबर या संपाबाबत चर्चा झाली; मात्र मागण्यांबाबत ठोस असे काही मिळाले नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा संप असाच सुरू राहणार आहे. सरकारला जागे करण्यासाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याचे अध्यक्ष शंकर पुजारी यांनी सांगितले.