रत्नागिरी:- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत असणारी सर्व प्रलंबित प्रकरणे बँकांनी मार्गी लावून जिल्ह्याचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात या बाबत सर्वच बँकांची आज आढावा बैठक झाली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकुंद खांडेकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी बँकनिहाय प्रलंबित आणि नाकारलेल्या प्रकरणांचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हा प्राधान्याने घ्यावा. जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करुन जिल्ह्याला अग्रस्थानी ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. ज्या बँकांची खराब कामगिरी आहे. अशा बँकांनी अधिक लक्ष केंद्रीत करावे. जिल्हा उद्योग केंद्राने अधिक प्रकरणे बँकांकडे पाठवावीत, जेणेकरुन नाकारलेल्या प्रकरणांची परिपूर्तता होईल. अग्रणी जिल्हा व्यवस्थापकांनी या बाबत सात्याने बँकांशी समन्वय ठेवून आढावा घ्यावा,असे ही म्हणाले. यावेळी पीएमइजीपीचाही आढावा घेतला.