मोरीमुळे ग्रामस्थांच्या घराकडे येण्या-जाण्याचा मार्ग बंद होण्याची भीती
काँक्रीटीकरण केलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी मोरीचे बांधकाम करा; स्थानिकांची प्राधिकरण विभागाकडे निवेदनातून मागणी
रत्नागिरी /प्रतिनिधी:-मिऱ्या नागपूर महामार्गाचे काम हातखंबा येथून जोमात सुरू आहे. साळवी स्टॉप पासून सर्व अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली आहे. तर काहींनी स्वतः हून आपली दुकाने बाजूला केली आहे. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी ठिकठिकाणी मोऱ्या पाडण्याचे काम सुरू आहे. मात्र हातखंबा तिठ्यावरील एका घरासमोर थेट मोरीचां खड्डा पाडण्याचे काम सुरू आहे.
साळवी स्टॉप ते हातखंबा या भागात सर्व्हिस रोडच्या बाजूने खोदाई करून सपाटीकरण सुरू आहे. काही ठिकाणी खोलगट भाग आहे. त्याठिकाणी डंपरच्या सहाय्याने दुसऱ्या ठिकाणाहून माती आणून भराव टाकून रस्त्याची लेव्हल करण्यात येत आहे. तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मोऱ्यासाठी खड्डे देखील पाडले जात आहेत. हे काम हातखंबा तिठ्यापासून पुढे रत्नागिरीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र हातखंबा तिठ्यावरील भागात एका घरासमोरच भला मोठा खड्डा पाडून मोरी उभारण्याचे प्राधिकरण विभागाचे नियोजन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी घराच्या समोर खड्डा न काढता एका बाजूला पाडण्यात आला होता. मात्र ज्यांच्या जागेत मोरीसाठी खड्डा पाडण्यात आला त्या जमीन मालकांनी प्राधिकरण विभागाला अर्ज केला व प्राधिकरण विभागाच्या टेकनिकल टीमचे गणित बिगडवले. मूळात प्राधिकरणाच्या टेकनिकल टीमने पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होईल अशाच ठिकाणी मोरीसाठी खड्ड्यांची खोदाई केली होती. मात्र जागेमालकाच्या सांगण्यावरून दोन दिवसात खोदाई करून पूर्ण झालेला खड्डा बुजवून थेट एका घरासमोर भला मोठा नवीन खड्डा खोदाई करून त्याठिकाणी मोरीचे काम सुरू आह. रातोरात अचानक मोरीच्या खड्ड्यात बदल करून घराच्या समोरच खोदाई करत असल्याने घरमालकानी मोरीला विरोध दर्शवला आहे.
ग्रामस्थांचे जाण्या-येण्याचे मार्ग बंद करणार का?
थेट घरासमोर खोदाई करत असलेले मोरीचे काम प्राधिकरण विभागाने तातडीने थांबवावे, टेकनिकल टीमच्या योग्य अंदाजाप्रमाणे पहिल्यांदा जिथे खड्डा खोदाई करून काँक्रीटीकरण केले आहे त्याच ठिकाणी मोरी करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ कपिलानंद कांबळे यांनी निवेदनाद्वारे प्राधिकरण विभागाला केली आहे. टेकनिकल टीमने किंवा प्राधिकरण विभागाने कोणाचीही मर्जी राखण्यासाठी आपल्या कामाची दिशा बदलू नये. खोदाई करून पूर्ण झालेला खड्डा बूजवून थेट घरासमोर नवीन खड्डा खोदून स्थानिक ग्रामस्थांच्या घरांकडे जाण्या-येण्याचे मार्ग आता प्रशासन बंद करनार का? असा सवाल ही कांबळे यांनी आता उपस्थित केला आहे.