11 क्रशरमुळे घरांना गेलेत तडे, आंबा, काजूचे नुकसान, पाण्याचे स्रोत आटले
संगमेश्वर / प्रतिनिधी:- संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथे 11 खाणी असून याठिकाणी ब्लास्टिंग द्वारे काळ्या दगडाचे उत्खनन गेले कित्येक वर्ष सुरु आहे. या ब्लास्टिंग मुळे वांद्री गावातील घरांना तडे गेले आहेत. तसेच धुळीमुळे आंबा, काजू बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ब्लास्टिंगमुळे पाण्याचे स्रोत आटले आहेत. या प्रकारला कंटाळून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या पत्रात त्यांनी कायमस्वरूपी तोडगा काढा अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे कि, वांद्री येथे एकूण ११ खाणी कार्यरत आहेत.या सर्वच खाण मालकांकडून दर दिवशी आळीपाळीने मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केली जाते.या साठी बोर ब्लास्टिंग सारखी पद्धत वापरली जात असून अतिशय मोठ्या खोलीचे खड्डे मारून स्फोटाद्वारे दगड उत्खनन केले जाते. आजपर्यंत या समस्येवर वारंवार चर्चा ग्रामपंचायत पातळीवर झाली आहे.परंतु व्यावसायिकांनी त्यांच्या कार्यपद्धतीत कोणताही सकारात्मक बदल केलेला दिसून आलेला नाही.परिणामी गावातील ग्रामस्थांची घरे दिवसेंदिवस खिळखिळी होत असून यामुळे ग्रामस्थांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.याबरोबरच या हादऱ्यामुळे नागरी वस्तीतील पाणी पुरवठा करणारे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत नष्ट होत असून दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे.
या समस्येतून कायमस्वरूपी सुटका होण्यासाठी वांद्री गावाच्या हद्दीतील सर्व दगड खाणी कायम स्वरूपी बंद करण्यात याव्यात अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. यावर ग्रामपंचायत सदस्यांसह सर्व ग्रामस्थांच्या सह्या आहेत. याबाबत आपल्या पातळीवर निर्णय न झाल्यास आम्ही उग्र आंदोलन करणार आहोत, असेही म्हटले आहे. तरी या समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढण्याची मागणी पत्रद्वारे केली आहे.