चिपळूण:-रत्नागिरी जिल्हा रेशनिंग आणि केरोसीन चालक-मालक संघटनेची शुक्रवारी २७ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांच्या चिपळूण येथील त्यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे.
यावेळी रेशन दुकानदारांच्या प्रलंबित समस्यांबाबत चर्चा होणार आहे.
ही संघटना रेशन दुकानदारांच्या न्याय्य हक्कासाठी झटत आहे. या संघटनेच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत तात्पुरत्या स्वरूपातील रेशन दुकानदारांना कायमस्वरूपी करण्याबाबत चर्चा होईल. या प्रश्नाच्या अनुषंगाने शासन-प्रशासनाशी पाठपुरावा सुरू असून यामध्ये यश येईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, रेशन दुकानदारांना धान्य विक्रीचे कमिशन अनियमित मिळत असून ते नियमित मिळावे, कमिशनमध्ये वाढ मिळावी, यादृष्टीने शासनाकडे पाठपुरावा सुरू असून तसे निवेदन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आले आहे. या विषयाच्या अनुषंगानेदेखील चर्चा होईल.
रत्नागिरी जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना २०१८ मध्ये पॉस मशीन देण्यात आल्या आहेत. मात्र, त्या मुदतबाह्य झाल्या आहेत. मशीन नव्याने मिळाव्यात, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली असून याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. या विषयावरही चर्चा होईल.
अन्न सुरक्षा विधेयक लागू झाल्यावर फेब्रुवारी २०१४ ते जुलै २०१५ या कालावधीतील ९३५ रेशन दुकानदारांचे सुमारे ४ कोटी ६१ लाख २४ हजार ८०० रुपये वाहतूक रिबेट मिळालेले नाही. ते मिळण्याच्या दृष्टीने भूमिका ठरविण्यासंदर्भात चर्चा होईल. या बैठकीला कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
रेशन दुकानदार संघटनेची चिपळूणमध्ये आज बैठक
