औषधे खरेदीबाबत प्रस्ताव द्या – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
रत्नागिरी:- जिल्हा नियोजन समितीमधून आवश्यक औषधे खरेदीचा प्रस्ताव द्यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज झालेल्या रुग्ण कल्याण समिती प्रादेशिक मनोरुग्णालय नियमक मंडळाच्या सभेत केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, डॉ. ज्योत्स्ना देशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड, मानसशास्त्र तज्ज्ञ बिना कळंबटे, मनोविकार तज्ज्ञ डॉ. शाश्वत शेरे आदी उपस्थित होते.
प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजयकुमार कलकुटगी यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले. जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, रुग्णालयाच्या इमारती खराब होऊ नयेत, यासाठी वेदर शेडचा वापर करावा. रिक्त जागा भरण्याबाबत पत्रव्यवहार करावा. रुग्णालयाच्या स्वयंपाकगृह दुरुस्तीसाठीही निधी दिला जाईल.
आजच्या या सभेस वार्डनिहाय व आहार विभाग वापरण्यात येणारी साहित्य सामुग्री खरेदी करणे, पेस्ट कंट्रोल करुन घेणे, डीश टिव्ही व सीसीटिव्ह बसविणे, इलेक्ट्रीक रिक्षाचा वापर आहार विभागातून रुग्ण कक्षाकरिता जेवण देण्यासाठी रिक्षा गोल रॅक तयार करणे, रुग्णांवर करण्यात आलेल्या खर्चास मंजुरी मिळणे, तातडीच्या वेळी रुग्णांच्या खर्चाकरिता आगाऊ रकमेस मंजुरी मिळणे आदी विषयांना मंजुरी देण्यात आली.