मुंबई:-विरोधी पक्षातील सत्तालोलुप पक्ष ‘आयएनडीए’आघाडीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. ‘आयएनडीए’ आघाडी म्हणजे 10 तोंडी रावण असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, मंगळवारी केली.
मुंबईत विजयादशमीच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘आयएनडीए’आघाडीचे लोक फक्त मोदींवर टीका करतात. पण, मोदींमुळे देशाने झेप घेतलीय. आगामी 2024च्या निवडणुकीत देशाची जनता ‘आयएनडीए’ आघाडीरूपी रावणाचे दहन करेल आणि पंतप्रधान मोदींच्या रुपाने पुन्हा एकदा एनडीचे सरकार स्थापन होईल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. त्यासोबतच महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा आमच्याट निवडून येतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर दसरा मेळव्यात मोठं वक्तव्य केलं. शिवरायांची शपथ घेऊन सांगतो की मी मराठा आरक्षण देणारच, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दसरा मेळाव्यात दिला. कुणावरही अन्याय न करता. कुणाचंही आरक्षण काढून न घेता. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणारं. एकनाथ शिंदेंच्या रक्तात शेवटचा थेंब असेपर्यंत मी मराठा समाजासाठी लढणार, सर्व समाजबांधव आपले आहेत.मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने, शपथ घेऊन, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सांगतो. मी मराठा समाजाला आरक्षण देणार, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरे गटावर टीकास्त्र सोडताना शिंदे म्हणाले की, मी शिवसेना वाचवली. धनुष्यबाण तुम्ही गहाण ठेवला तो मी सोडवला. सरकार पडणार पडणार म्हणता पण आता आम्हाला 210 आमदारांचा पाठिंबा आहे. आता तुम्ही म्हणता मुख्यमंत्री बदलणार, पण मला पदाची चिंता नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले. बाळासाहेबांनी ज्यांना नाकारले त्यांचे तळवे तुम्ही चाटत आहात. तुम्ही महागद्दार आहात असा टोला शिंदेंनी लगावला. ठाकरे गटाने शिवसेनेच्या खात्यातील 50 कोटी रुपये मागितले. पण निवडणूक आयोगाने त्यांना पैसे देता येणार नाही असे सांगितले. आमच्यावर 50 खोक्यांचे आरोप करता… पण स्वतः 50 कोटींसाठी आमच्याकडे येता. यांना खोके चालत नाहीत. यांना कंटेनर पाहिजेत याविषयी योग्य वेळी सविस्तर बोलेन असा गर्भीत इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.