चिपळूण/ओंकार रेळेकर:-पारदर्शकता अखंड सेवा साधना अर्थकारणाबरोबर समाजसेवा व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लि. चिपळूण या संस्थेचा ३१ वा वर्धापनदिन व सहकार गौरव सोहोळा रविवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता चिपळूण बहादूरशेखनाका येथील संस्थेच्या सहकार भवनमधील सहकार सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सेवानिवृत्त अप्पर आयुक्त तथा सहसचिव सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्रालय मुंबई एस. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर महाराष्ट्र, राज्य पुणे सेवानिवृत्त सहनिबंधक लेखापरीक्षण तानाजी कवडे, रत्नाप्पा कुंभार विचार मंच जयसिंगपूर संस्थापक सदस्य बाबासाहेब परीट, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ३१ वर्षात पतसंस्थेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. या पतसंस्थेने आर्थिक व्यावसायिकता संभाळताना सामाजिक बांधिलकी देखील जोपासली आहे. आर्थिक व्यावसायिकतेबद्दल म्हटले, तर या संस्थेने १ हजार कोटी ठेवींचा टप्पा गाठला आहे. तर आगामी पाच वर्षाच्या कालखंडात दोन हजार कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. चिपळूण नागरीची १९ ऑक्टोबर अखेर आर्थिक स्थिती पुढीलप्रमाणे सभासद संख्या १ लाख ३९ हजार ५५३, भाग भांडवल ६९ कोटी ४४ लाख, स्वनिधी १४६ कोटी ३८ लाख, ठेवी १०७४ कोटी ३५ लाख, कर्जे ८४२ कोटी ८६ लाख (पैकी सोने तारण कर्ज ३१४ कोटी ३० लाख) , गुंतवणूका ३५२ कोटी ९० लाख, मालमत्ता ३४ कोटी ७१ लाख, नफा मार्च २०२३ अखेर १९ कोटी १८ लाख असे आहे.
कोरोना काळ असो अथवा महापूर काळ असो या कालखंडात या संस्थेने सभासदांबरोबरच सर्वसामान्यांना सहकार्याचा हात दिला आहे. तर गेल्या महिन्यात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था व प्रशांत यादव मित्र मंडळातर्फे अस्थिरुग्ण तपासणी व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठे रक्तदान शिबिराचे १० सप्टेंबर रोजी घेण्यात आले होते. या शिबिरांना चिपळूणवासीयांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. एकंदरीत चिपळूण नागरी पतसंस्थेने आर्थिक व्यावसायिकते बरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आदर्शवत काम केले आहे.
या पतसंस्थेचा ३१ वा वर्धापन दिन व सहकार गौरव सोहळा रविवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता बहादूरशेखनाका येथील संस्थेच्या सहकार भवन मधील ‘सहकार सभागृहात’ आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संस्थेच्या सहकार्यातून व्यवसायात आर्थिक सक्षम झालेल्या खातेदारांचा हा आगळा- वेगळा गौरव सोहळा असणार आहे. तसेच सायंकाळी ४ वाजता चिपळूण नागरी परिवाराचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्यासह संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
राष्ट्राच्या विकासासाठी सहकाराचे निर्विवाद महत्व-सुभाषराव चव्हाण
राष्ट्राचा विकास साधण्यासाठी सहकाराचे महत्त्व हे निश्चित निर्विवाद आहे. सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तींना देखील व्यवस्थापन प्रक्रियेत सहभाग घेता येतो. सहकारी संस्थांची कार्यपद्धती लोकशाही तत्त्वावर आधारित असल्याने कोणालाही या प्रक्रियेत समाविष्ट होता येते. सहकाराच्या माध्यमातून व्यक्ती विकास आणि व्यक्ती विकासातून सामाजिक विकास साधला जातो. सामाजिक मूल्याची जपणूक सहकारी चळवळीच्या माध्यमातून होत असते ‘नफा’ या शब्दापेक्षा ‘सेवा’ या नावाला प्राधान्य देऊ देण्यात येऊन एकूण सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी सहकार क्षेत्र महत्त्वपूर्ण ठरते. सहकारामुळे समाजाचे शांततापूर्वक मार्गाने परिवर्तन घडवून आणता येते, अशी भावना संस्थेच्या ३१ व्या वर्धापन दिन व सहकार गौरव सोहळ्यानिमित्त संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी व्यक्त केली.