काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांचे पक्षातील नाराजांना आवाहन
लांजा:- काँग्रेस पक्ष हा महासागर आहे. आणि अशावेळी पक्षात हा काही ना काही कारणावरून छोट्या-मोठ्या कुरबुरी, मतभेद होतच असतात.
त्यामुळे या नाराजीतून वेगळी चूल मांडण्यापेक्षा आपण सर्वजण एकत्र येऊया, चर्चा करूया. चर्चेतुन प्रश्न सोडवूया. प्रश्न न सुटल्यास वरिष्ठ पातळीवर त्याबाबत प्रश्न मांडूया आणि त्या उपर जर तुमचे समाधान झाले नाही तर तुम्हाला जे अभिप्रेत असेल ते तुम्ही करा.पण एकदा चर्चा तर करु असे आवाहन काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी काँग्रेस पक्षातील नाराजांना केले आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्यावर अनेक ज्येष्ठ, जुने जाणते काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्याचबरोबर यापूर्वी तालुकाध्यक्ष निवडीत अचानक झालेले फेरबदल व अन्य विविध प्रश्ना संदर्भात वरिष्ठ पातळीवर प्रश्न मांडून देखील तोडगा न निघाल्याने काँग्रेसचे अनेक जुने जाणते पदाधिकारी हे वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहेत.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी या सर्व जुन्या जाणत्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना चर्चेतून मार्ग काढण्यासाठी आवाहन केले आहे . त्याबद्दल त्यांनी सांगितले की राजकीय पक्ष म्हटला की त्यामध्ये थोडे अंतर्गत मतभेद हे असतातच. म्हणून पक्षाला रामराम ठोकणे किंवा वेगळी चूल मांडणे हे योग्य नव्हे .नाना सप्रे सारख्या अनेक बुजुर्ग कार्यकर्त्यांनी हा तालुक्यात काँग्रेस पक्षाला महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. त्यामुळे जे कोणी पक्षातील नाराज आणि जेष्ठ जुने जाणते कार्यकर्ते असतील त्यांनी व आपण सर्वांनी एकत्र बसू या तुमचे जे काही प्रश्न असतील, ज्या काही समस्या असतील आणि नाराजीचे कारण असेल ते आपण चर्चा करून सोडावूया. चर्चेतून यावर काही तोडगा निघतो का ते पाहूया. आणि आपल्या स्तरावर जर त्यावर काही तोडगा निघत नसेल तर आपण पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले किंवा अन्य पक्षश्रेष्ठींकडे याबाबत प्रश्न मांडूया. तुमच्या काही प्रश्न, शंका असतील किंवा नाराजी असेल ती पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया. मात्र तडकाफडकी पक्ष सोडून वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेवून करू नका असे आवाहन शेवटी वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे.