सिंधुदुर्ग:-फुलपाखरु महोत्सवामुळे पारपोली गावाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशाप्रकारचे नावीन्यपूर्ण महोत्सव सातत्याने होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
सावंतवाडी तालुक्यात पारपोली येथे आयोजित करण्यात आलेल्या फुलपाखरू महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी श्री. चव्हाण बोलत होते.
फुलपाखरांचचे गाव अशी २०१५ पासून ओळख असलेल्या पारपोली गावात आजपासून फुलपाखरू महोत्सवाला सुरुवात झाली. संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित या फुलपाखरु महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, माजी आमदार राजन तेली, उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण पुढे म्हणले, जिल्ह्याची विकासाकडे घोडदौड सुरू आहे. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सिंधुरत्न योजना राबविल्याने जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. पारपोली गावाला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ८० लाखाचा निधी दिलेला आहे. यापुढेही जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी भरीव निधी देण्यात येईल. आपल्या जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात जैवविविधता लाभली असल्याने ती अबाधित ठेवण्यासाठी गावकऱ्यांनी आणि विशेषतः युवकांनी प्रयत्न करण्याचे देखील पालकमंत्र्यांनी आवाहन केले.
श्री केसरकर म्हणाले, हा महोत्सव नियमित व्हावा जेणेकरून इथे पर्यटक सातत्याने येतील आणि पर्यटन वाढेल. जिल्ह्यातील उभा दांडा हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे. पारपोली गावाने आता जगात फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखले निर्माण केली आहे. न्याहरी निवास योजना राबवून सर्वांनी आपल्या गावांचा विकास करावा. गावकऱ्यांनी एकत्र येऊन विविध योजनांचा लाभ घ्यावा. जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे एकमेकांना जोडून tourist circuit बनवावे असेही ते यावेळी म्हणाले.
जिल्हाधिकारी किशोर तावडे म्हणाले, आपला जिल्हा जैवविविधतेने नटलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात पर्यटक आल्यानंतर गावकऱ्यांनी न्याहरी योजनेच्या माध्यमातून पर्यटकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
श्री रेड्डी म्हणाले, पारपोली गावात जैवविविधता असल्याने या गावात १८० पेक्षा जास्त फुलपाखरु प्रजाती आढळतात. २०१५ साली या गावाला ‘फुलपाखरांचे गाव’ म्हणून सन्मान मिळाला आहे. पर्यटन वाढावे आणि स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी असे महोत्सव सातत्याने होणे आवश्यक आहे. फुलपाखरु महोत्सवामुळे पारपोली गावाला जागतिक ओळख मिळणार आहे. असे महोत्सव जास्तीत जास्त दिवस सुरू ठेवण्याचे आमचे प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले
यावेळी महोत्सवाच्या लोगोचे अनावरण आणि माहिती पुस्तिकेचे देखील प्रकाशन यावेळी करण्यात आले तसेच सरपंच कृष्णा नाईक, मानद वन्यजीव संरक्षक काका भिसे यांचा देखील सन्मान करण्यात आला. कार्यक्रमानंतर श्री केसरकर यांनी बचत गटांच्या स्टॉलला भेट देऊन पाहणी केली.