रत्नागिरी:-भातकापणी करताना घ्यावयाची काळजी आणि प्रक्रियेविषयी रिलायन्स फाउंडेशन आणि कृषी संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने यूट्यूब लाइव्ह कार्यक्रम घेण्यात आला.
अनेक शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला.
कोकणामध्ये भात हे मुख्य पारंपरिक पीक आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भातलागवड केली जाते. यावर्षी पाऊस उशिरा आल्याने लागवडही उशिरा सुरू झाली. त्यामुळे भाताची कापणीदेखील उशिरा सुरू आहे. त्याच अनुषंगाने भातकापणी करताना घ्यावयाची काळजी आणि प्रक्रियेविषयी रिलायन्स फाउंडेशन आणि शिरगाव-रत्नागिरी येथील कृषी संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कोकण विभागातील भातलागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. विजय दळवी उपस्थित होते.
या कार्यक्रमात वैभव विळ्याचा योग्य वापर, साठवणूक करताना घ्यावयाची काळजी इत्यादीविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात शेतकऱ्यांनी ऑनलाइन चॅटच्या माध्यमातून शंका विचारल्या. डॉ. दळवी यांनी कृषी संशोधन केंद्रातील भात संशोधनासंदर्भात माहिती दिली. शेतकऱ्यांनी केंद्रात येऊन प्रक्षेत्रास भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे यांनी, तर तांत्रिक मार्गदर्शन रिलायन्स फाउंडेशनचे मनोज काळे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम सहायक प्रणाली गोरे यांनी केले.