मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे असे राजा होते ज्यांनी भारताची सागरी शक्ती आणि क्षमता समजून घेतली होती. बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान जागतिक सागरी शिखर परिषदेच्या समारोप प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “भारताचा सागरी इतिहास खूप जुना आहे आणि हडप्पा संस्कृती असतानाही भारत आपली सागरी क्षमता विकसित करून इतर देशांशी व्यवहार करत असे. भारताच्या सामर्थ्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी, पंतप्रधान मोदींनी गेल्या नऊ वर्षांत बंदरे आणि त्यासंबंधित पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि भारताच्या ब्लू इकॉनॉमीला समृद्ध करण्यासाठी ज्या प्रकारच्या योजना तयार केल्या आहेत, त्यामुळे भारत सागरी क्षेत्रात पुन्हा एकदा एक शक्ती म्हणून उदयास येत आहे,” असे ते म्हणाले.
तसेच भारत आज जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे आणि पंतप्रधान मोदीजी तिला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवू इच्छित आहेत. भारताची सागरी क्षमता यामध्ये सर्वात मोठी भूमिका बजावत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात होणाऱ्या जागतिक सागरी शिखर परिषदेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मला वाटते, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र आता केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली वाढवण येथे एक नवीन बंदर तयार करत आहे. हे बंदर जेएनपीटी बंदरापेक्षा तीन पटीने मोठे असेल. यावर जगातील सर्वात मोठ्या जहाजाची देखील पूर्तता करता येईल. केंद्र सरकारसोबत काम करताना आता सर्व अडथळे दूर झाले असून मच्छीमार समाज आणि भूमीपुत्रांना सोबत घेऊन या बंदराचा विकास करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच चीन, कोरिया आणि जपाननंतर आता भारतात जहाजबांधणीची मोठी क्षमता आहे. महाराष्ट्रात आम्ही एक नवीन शिपिंग आणि बंदर धोरण तयार केले आहे ,ज्यामध्ये आमचे धोरण जहाज बांधणीसारख्या व्यवसायांसाठी एक इकोसिस्टीम निर्माण करण्यासाठी कार्य करते, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.