रत्नागिरी:-रत्नागिरीकरांनी संपूर्ण जगासाठी आयोजित केलेली मॅरेथॉन असा जिचा उल्लेख केला जात आहे. त्या कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या प्रचारासाठी विश्वविक्रमी रनर आशीष कासोदेकर येत्या शनिवारी (दि.२१ ऑक्टोबर) रत्नागिरीत येत आहेत.
धावनगरी रत्नागिरीचा प्रचार जोरात सुरू आहे. नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी होणाऱ्या या मॅरेथॉनचा सरावसुद्धा सुरू झाला आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणून आशीष कासोदेकर येत्या शनिवारी संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत रनटेल्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून रत्नागिरीकरांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये होणार आहे.
सलग ६० दिवसांत ६० मॅरेथॉन धावण्याचा विश्वविक्रम आशीष कासोदेकर यांच्या नावावर आहे. नुकतेच त्यांनी लो टू हाय या उपक्रमाच्या माध्यमातून केरळ ते लडाख हे ४००० किलोमीटरचे अंतर ७६ दिवसांत धावून पूर्ण केले आहे. लडाखमध्ये ५५५ किलोमीटर धावलेले ते एकमेव भारतीय आहेत. मॅन्स वर्ल्ड मॅगेझीनने त्यांचा समावेश भारतातील दहा टफेस्ट मॅन यादीमध्ये केला आहे.
श्री. कासोदेकर यांना ऐकण्यासाठी रत्नागिरीतील सर्व नागरिकांनी शनिवारी संध्याकाळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मॅरेथॉनचे मुख्य आयोजक सुवर्णसूर्य फाउंडेशनने केले आहे.
कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या प्रचारासाठी आशीष कासोदेकर येणार रत्नागिरीत
