सिंधुदुर्ग:-गोरगरीब जनता आपल्या कामासाठी तहसीलदार कार्यालयात येते. असे असताना रस्त्यावर कारवाई करायची सोडून तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आलेल्या वाहनधारकावर कारवाई कराल तर याद राखा.
अवैध वाहतुकीवर कारवाई हवी, किंवा दुचाकीस्वारांनी हेल्मेट हे वापरलेच पाहिजे. या कारवाईबात आमचे दुमत नाही. परंतु सर्वसामान्य जनतेला कार्यालयाच्या आवारात येऊन त्रास देण्याची नवीन स्टाईल नको. ज्या आवारात कारवाई करतात त्या तहसीलदारांनाच माहिती नाही. अशा स्थितीत तुम्हाला हे अधिकार कोणी दिले? असे खडे बोल सुनावत नितेश राणे यांनी आरटीओच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
दरम्यान ज्या वाहनधारकांवर कारवाई केलात त्यांचे पैसे परत करा. तुम्हाला कारवाईसाठी कणकवलीच मिळते का? असे विचारत आमदार नितेश राणे यांनी आरटीओ काळे यांच्याशी फोन द्वारे चर्चा केली आणि ‘हे काय चालवलात’ असा सवाल करत त्यांनाही संबंधितांना सूचना द्या असे आदेश दिले.
यावेळी आमदार नितेश राणे यांना आरटीओ अधिकारी श्री. पाटील यांनी ‘आम्ही गेटच्या बाहेर कारवाई करत होतो’, असे सांगताच अनेकांनी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात कारवाई होत होती गेटच्या बाहेर होत नव्हती असे सांगत फोटो सादर केले. त्यामुळे आरटीओच्या अधिकाऱ्यांची पोलखोल झाली. आरटीओ अधिकारी श्री. पाटील यांनी ‘कारवाई थांबवायचे आदेश आलेत, आम्ही कारवाई करत नाही’ असे सांगितले. त्यावर तुम्ही कारवाई करा मात्र ती तहसील कार्यालयाच्या आवारात नको. महामार्गावर कारवाई करा. तुमच्या कारवाईत कुणी हस्तक्षेप करणार नाही. असे आमदारांनी सांगितले. यावेळी आरटीओच्या अधिकाऱ्यांनी देखील आम्ही यापुढे रस्त्यावर कारवाई करू. तहसीलदार कार्यालयाच्या आवारात येत नाही असे सांगितले. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, समीर प्रभू गावकर, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, सदा चव्हाण, आदि उपस्थित होते.
तहसील कार्यालय आवारातील कारवाईवरून नितेश राणे यांचा आरटीओ अधिकाऱ्यांना सज्जड इशारा
