प्रधानमंत्री ऑनलाईन पद्धतीने करणार उद्घाटन
रत्नागिरी:- ग्रामीण भागातील युवकांसाठी ग्राम पंचायतस्तरावर प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन येत्या 19 ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होत आहे. यामध्ये जिल्ह्यातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांमध्ये हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संबंधित सर्वच यंत्रणांनी सज्ज होऊन काटेकोर नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीचे अध्यक्ष एम. देवेंदर सिंह यांनी दिल्या.*
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांच्या उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या पूर्वनियोजन आढावा बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे, तसेच ग्रामीण भागातील युवक-युवतींना स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्रातील 511 ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यातील शिरगाव, नाचणे, ता. रत्नागिरी. खेर्डी, सावर्डे, ता.चिपळूण. पालशेत, ता. गुहागर. उमरोली, ता. मंडणगड. जालगाव, ता. दापोली. भरणे, ता. खेड. सागवे, ता. राजापूर. भांबेड, ता. लांजा. कडवई, ता. संगमेश्वर. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ज्या गावात हे केंद्र सुरु होणार आहे, त्याच्या आजुबाजूच्या गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध घटकांना यामध्ये सहभागी करून घ्यावे.
या केंद्रांची माहिती या उद्घाटन सोहळ्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार आहे. संबंधितांनी अधिकाधिक व्यक्तिंपर्यंत कौशल्य विकास केंद्रांची व त्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांची माहिती विविध माध्यमातून पोहोचवावी. यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांची नोंदणी होईल. प्रत्येक सेंटरसाठी अनुभवी कार्यक्रम प्रमुख नियुक्तकरावा. कार्यक्रमासाठी मंडप किंवा सभागृह व्यवस्था, बैठक व्यवस्था, दृक-श्राव्य व्यवस्था, इंटरनेटची सुविधा, स्क्रीनची उभारणी, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आदी व्यवस्था कराव्यात. तसेच वीज पुरवठा सुरळीत राहावी. यासाठीची व्यवस्था करावी, असे त्यांनी सूचित केले. कार्यक्रमासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये जागा निश्चित करणे, प्रशिक्षण केंद्र असलेल्या स्थळावर प्रक्षेपणासाठी ऑडिओ व्हिज्युअल साधनांची उपलब्धता करणे, मूलभूत सोयी सुविधांची व्यवस्था करणे आदिंबाबही त्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या.