सेक्युलर मुव्हमेंटचे कार्यकर्ते आक्रमक ; जिल्हा प्रशासनाकडे तक्रार
देवरुख:- नगरपंचायत मध्ये अनधिकृत पणे धार्मिक पूजा करण्याचा प्रकार घडल्याची चर्चा अनेक दिवस शहर परिसरात सुरु आहे. या प्रकाराला आता सेक्युलर मुव्हमेंटने तोंड फोडले आहे . अशा प्रकारे पूजा न करण्यासंबंधी योग्य ती समज देऊनही देवरुख नगरपंचायतीने जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण केल्याची तक्रार सेक्युलर मुव्हमेंट कडून करण्यात आली आहे .
याबाबत अधिकृत असे की , काही दिवसांपूर्वी देवरूख नगर पंचायतने एका धार्मिक पूजेचे आयोजन केले होते . कोणत्याही शासकीय कार्यालयात विशिष्ट धार्मिक पूजा किंवा कर्मकांड करणे हे कायदयाने कारवाई पात्र आहे असे असल्याने निमंत्रण पत्रिकेच्या संदर्भासह धार्मिक पूजेला संगमेश्वर तालुका सेक्युलर मुव्हमेंटच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला होता . तसेच सेक्युलर मुव्हमेंट कडून समज देखील देण्यात आली होती असे सांगण्यात येत आहे .मात्र सेक्युलर मूव्हमेंटच्या कार्यकर्त्यांच्या विरोधाला न जुमानता पूजा अर्चेचा कार्यक्रम पुढे रेटण्यात आला . यामुळे सेक्युलर मुव्हमेंटच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे . सेक्युलर मुव्हमेंटच्याविरोधाला न जुमानता सदरचा धार्मिक विधी करण्यात आला त्यावेळी बहुजनांचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची प्रतिमा चक्क एका कोपऱ्यात तर दुसऱ्या कोपऱ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती . ज्या महापुरुषांनी तह हयात मानव कल्याण मार्ग स्वीकारून धर्मांधतेला झिडकारले अशा महामानवांच्या विचारांचा यामुळे अपमान झाल्याचे सेक्युलर मुव्हमेंटने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे . दरम्यान नगरपंचायतीच्या प्रशासकांना हे प्रकरण आता चांगलेच भोवणार असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे . संगमेश्वर तालुक्याचे सेक्युलर मुव्हमेंटचे सर्व कार्यकर्ते अजित कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आता आक्रमक झाले असून सध्या सनदशीर मार्गाने लढा सुरू असल्याचे माध्यमांना सांगण्यात आले आहे . सेक्युलर मुव्हमेंट कायदेशीर रित्या लढणार असल्याने जनतेच्या पैशांची लूट आणि उधळण करणाऱ्या देवरुख नगरपंचायतीला आता तरी चाप बसणार का ? असा सवाल नागरिकांमधून विचारण्यात येत आहे .शहरांमध्ये वाहतूक समस्या ,अतिक्रमण ,स्वच्छता विषयक सोयी – सुविधांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करणाऱ्या नगरपंचायतीने जनतेच्या पैशावर वैयक्तिक किंवा सार्वजनिक पूजा अर्चा करण्याचे थांबविले नाही तर यापुढे हा लढा आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे सेक्युलर मुव्हमेंटच्या अजित कांबळे यांनी सांगितले आहे .
अनधिकृत धार्मिक पूजा-अर्चा देवरुख नगरपंचायतला भोवणार?
