संगमेश्वर:- भारताचे दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिन सर्व भारतभर ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाच्या निमित्ताने श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुखच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांचा शुभारंभ निवृत्त प्राचार्य डॉ. सुरेश जोशी आणि मान्यवर उपस्थितांनी दीप प्रज्वलन, सरस्वतीपूजन आणि डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना अभिवादन करुन केला.
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. देवरुखचे सुपुत्र आणि मौज प्रकाशन या ख्यातनाम प्रकाशन संस्थेचे साक्षेपी संपादक व लेखक स्व. श्री. पु. भागवत यांचे जन्म शताब्दी वर्षानिमित्त मौज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मराठी साहित्याच्या अभ्यासिका अनघा लिमये यांनी केले. अनघा लिमये यांनी देवरुखचे सुपुत्र स्व. श्री. पु. भागवत यांच्या संपादक, प्रकाशक व लेखक म्हणून केलेल्या कार्यकर्तृत्वाचा आढावा उपस्थितांसमोर घेतला. याप्रसंगी डॉ. सुरेश जोशी, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. जी. के. जोशी, अशोक लिमये, वाचनालय कार्यकारणी सदस्य, वाचनालयाचे कर्मचारी आणि विविध शाळातील बालवाचक बहुसंख्येने उपस्थित होते.
यानंतर उपस्थित बालवाचकांनी साप्ताहिक रविवार वाचन कट्टा उपक्रमांतर्गत पुस्तकांचे वाचन केले. दिनांक १४ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनाच्या पूर्वसंध्येला वाचनालयातर्फे जि.प. शाळा देवरुख क्र. ४ मध्ये विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पुस्तके भेट देण्यात आली.
वाचन प्रेरणा दिनाचे औचित्त्य साधून दिनांक ५ ऑक्टोबर, २०२३ रोजी आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, निवे येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विविध प्रकारची ४०० हून अधिक पुस्तके प्रदर्शनात मांडण्यात आली होती. या प्रदर्शनाचे उद्घाटन दलित विकास संस्था निवेचे अध्यक्ष बंडोपंत यादव यांचे शुभ हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाचा लाभ शाळेतील सहाशे हून अधिक विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, संस्था चालक, पालक आणि ग्रामस्थांनी घेतला. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जि. प. शाळा हातीव येथे दिनांक १९ ऑक्टोबर रोजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांसाठी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे.
वाचन प्रेरणा दिनी देवरुखमधील प्राथमिक व माध्यमिक शाळांकरिता दुपारच्या सत्रात राष्ट्रभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शाळांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. सौ गायत्री जोशी व जनता बँकेचे निवृत्त अधिकारी राजाराम पंडित यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संदीप मुळ्ये यांनी केले. या स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे:-
प्राथमिक गट (इ.५वी ते इ.७वी) प्रथम-
जि. प. शाळा क्र. ४,
द्वितीय- ए. ए. पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल,
तृतीय- जि. प. शाळा क्र. २,
उत्तेजनार्थ- १. जि. प. शाळा, कांगणेवाडी,
२. जि. प. शाळा क्र. ३.
माध्यमिक गट (इ.८वी ते इ.१०वी ) प्रथम-
ए. ए. पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल,
द्वितीय- न्यू इंग्लिश स्कूल: संघ-१,
तृतीय- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला विद्यालय, उत्तेजनार्थ- न्यू इंग्लिश स्कूल: संघ-२.
सायंकाळी वाचन संस्कृती या विषयावर प्रा. डॉ. वर्षा फाटक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉ. फाटक यांनी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे बालपण आणि त्यांचे संस्कारक्षम वातावरणात झालेले संगोपन, त्यांची शैक्षणिक कारकीर्द, त्यांचा इंजिनिअर ते इस्त्रोचे समर्थ नेतृत्व करताना पूर्णत्वास नेलेल्या अग्नी, त्रिशूल, पृथ्वी, नाग या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या, त्याचप्रमाणे डॉ. कलाम यांचा पद्मश्री ते भारतरत्न पुरस्कारा पर्यंतचा प्रवास सविस्तरपणे विषद केला. विद्यार्थ्यांनी काय वाचावे, विविधांगी वाचनाने विचारात व व्यक्तिमत्त्वात होणारे अनुकूल बदल, अनेकांच्या जीवन प्रवासात पुस्तक वाचनाने दाखवलेल्या यशाचा मार्ग याबाबत सविस्तर विवेचन केले.
या दिनाच्या निमित्ताने संस्कार भारती कोकण प्रांत यांनी आयोजित केलेल्या वाचन साखळीमध्ये प्रा. डॉ. वर्षा फाटक यांनी ऑनलाइन सहभाग घेऊन एक तास वाचन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचनालयाचा कर्मचारी वृंद आणि कार्यकारणी मंडळ सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली.