रत्नागिरी:-महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गंत (मनरेगा) रेशीम उद्योग विकास योजनेतून रेशीम शेतीला चालना दिली जाणार आहे. या योजनेची रत्नागिरी जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेने पावले उचलली आहेत.
प्रत्येक तालुक्यात १० एकरप्रमाणे ९० एकर क्षेत्रावर तुती लागवडीचे पायलट प्रकल्प केले जाणार आहेत. त्यासाठी सुमारे पावणेचार कोटीचा प्रकल्प आराखडा करण्यात येणार आहे.
रेशीम संचालनालय, कृषी विभाग आणि पंचायत समिती यांच्यामार्फत रेशीम उद्योग योजना राज्यभरात प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे. या योजनेच्या पात्रतेसाठी शेतकर्याकडे कमीत कमी एक एकर तर जास्तीत जास्त पाच एकर क्षेत्र अपेक्षित आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना जिल्ह्यात सर्व नऊ तालुक्यांत राबवली जाणार आहे. त्यासाठी कृषी विभाग, पंचायत समितीतर्फे प्रत्येक तालुक्यात कार्यशाळा सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत खेड, रत्नागिरी, राजापूर काही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बैठका झाल्या असून त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात नव्वद एकरवर तुती लागवडीचे उद्दिष्ट
