रत्नागिरी:- कोकण रेल्वने दिवाळीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मध्य आणि दक्षिण रेल्वेने समन्वयाने हा निर्णय घेतला आहे.
20 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर या कालावधीत या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे चारमान्यांना दिवाळीनिमित्त कोकणात जाण्याची सोय झाली आहे. रेल्वेकडून चाकरमान्यांना दिवाळी भेट देण्यात आली आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनल ते मंगळुरू जंक्शन (01185) ही विशेष साप्ताहिक गाडी 20 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत प्रत्येक शुक्रवारी रात्री 10.15 वाजता मुंबईहून सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5.05वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल. त्याचप्रमाणे मंगळुरू जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनल (01186) ही विशेष साप्ताहिक गाडी 21 ऑक्टोबर ते 2 डिसेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी सायंकाळी 6.45 वाजता मंगळुरू स्थानकातून सुटणार आहे. गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी 2.25 वाजता लोकमान्य टिळक स्थानकावर पोहोचणार आहे.
या दोन्ही कोकण रेल्वे मार्गांवरून धावणाऱ्या गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुक्काम येथे थांबतील. तसेच बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल या स्थानकांवर त्यांना थांबे असतील, असे कोकण रेल्वेने म्हटले आहे.
कोकण रेल्वेची चाकरमान्यांना भेट; दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या
