रत्नागिरी:- कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्राचे उद्घाटन आज (दि. १२ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजता होणार आहे.
गेल्या काही वर्षांत कोकणातील कातळशिल्प या विषयावर चालू असलेल्या संशोधनामुळे अश्मयुगीन मानवाच्या राहणीमानाच्या पुराव्यांसोबत कोकणातील ज्ञात आणि अज्ञात पुरातत्त्व आणि ऐतिहासिक बाबींची नवनवीन पाने उलगडली जात आहेत.
गेल्या वर्षी भारत सरकारतर्फे या कातळशिल्पांना जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाला युनेस्कोने मान्यता दिली असून ९ ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या प्राथमिक यादीत करण्यात आला आहे.
या विषयाचे एकंदरीत मानवी जीवनातील स्थान, देशाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व ओळखून केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे कोकणातील कातळशिल्प संशोधन प्रकल्पाला राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प म्हणून मान्यता दिली आहे. हा प्रकल्प विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या पुढाकाराने आयआयटीएम प्रवर्तक टेक्नॉलॉजी फाऊंडेशन, आयआयटी मद्रास आणि रत्नागिरीतील निसर्गयात्री संस्थेद्वारे संचालित आयआयटी-हैदराबाद, जेएनयू-दिल्ली यांच्या सहयोगाने केला जाणार आहे. या प्रकल्पात विविध विषयांतील तज्ज्ञ मंडळी, रत्नागिरीमधील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, सीइएमएस, मुंबई विद्यापीठ यांचादेखील समावेश आहे.
या सर्वांगीण सखोल संशोधनाचा एक भाग म्हणून कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्र रत्नागिरीत सुरू होत आहे. या केंद्राच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयआयटीम प्रवर्तक, आयआयटी मद्रास आणि निसर्गयात्री संस्थेतर्फे करण्यात आले आहे. हे केंद्र 2658 A, डॉ बा. ना. सावंत रोड, राधाकृष्ण टॉकीजशेजारी, विनायक अपार्टमेंटसमोर, रत्नागिरी येथे आहे.
दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी संशोधन केंद्राचे उद्घाटन आणि पाहणी होईल. त्यानंतर दुपारी एक ते अडीच वाजेपर्यंतचा कार्यक्रम शेरे नाका येथील राणी लक्ष्मी बाई सभागृहात होईल. उपक्रमाचे सादरीकरण, चर्चासत्र असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे.