संगमेश्वर:-देवरूख येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचालित आंबव येथील राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल विभागाला नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन (एनबीए) या राष्ट्रीय संस्थेकडून २०२३-२४ ते २०२५-२६ या पुढील तीन शैक्षणिक वर्षांसाठी एनबीए मानांकन मिळाले आहे.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री रवींद्र माने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
असा बहुमान मिळविणारे कोकण विभागातील पहीले महाविद्यालय ठरले आहे, असे त्यांनी सांगितले.
विविध अभ्यासक्रमांमध्ये उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची गुणवत्ता तपासणे आणि त्यांचे निर्धारित निकषांनुसार मूल्यांकन करणे या उद्देशाने एनबीए कार्यरत असून त्यानुसार मंडळावरील शैक्षणिक तसेच उद्योग क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्ती, डायरेक्टर्स, विद्यापीठांचे उपकुलपती, राज्य आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी यांच्यामार्फत महाविद्यालयांमध्ये विभागवार तपासणी करण्यात येते. नियम आणि मानकांच्या अंमलबजावणीची सत्यता पडताळून मानांकन दिले जाते. मानांकनप्राप्त महाविद्यालयामधून निर्माण होणारे पदवीधर रोजगारक्षम व उद्योग क्षेत्रासाठी योग्य उमेदवार असतील, याची खात्री करण्यात आल्यावरच मानांकन दिले जाते. महाविद्यालयामध्ये एनबीएच्या तज्ञ समितीने दिलेल्या भेटीदरम्यान महाविद्यालयाचे व्हिजन, मिशन, मेकॅनिकल विभागाची शैक्षणिक उद्दिष्टे, अभ्यासक्रम, महाविद्यालयामधील अध्यापन आणि अध्ययनाची गुणवत्ता, आउटकम, विद्यार्थ्यांची शैक्षणिक व सहशैक्षणिक कामगिरी, प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रता व योगदान अशा सुमारे दहा प्रकारच्या निकषांतर्गत तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांशी संलग्न सोयीसुविधा, प्रथम वर्ष विभाग, प्रशासकीय सेवा सुविधा, संस्था स्तरावरील आधारभूत मदत आणि आर्थिक स्रोत याही गोष्टी सखोल तपासण्यात आल्या.
एनबीएच्या समितीमध्ये प्रा. एन. सिवा प्रसाद (समितीप्रमुख, प्रकुलगुरू, जीआयटीएएम युनिवर्सिटी, हैदराबाद), डॉ. व्ही. वेणुगोपाल रेड्डी (प्रोफेसर, जेएनटीयूए कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, आंध्र प्रदेश) आणि डॉ. पियूष गोहिल (गुजरात) यांचा समावेश होता. प्राचार्य डॉ. महेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख डॉ. सचिन वाघमारे, मेकॅनिकल विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रमाच्या जोरावर समितीसमोर उत्तम सादरीकरण केले. विद्यार्थी आणि प्राध्यापाकांबाबत उत्तम आधारशील आणि सदैव प्रेरणादायी व्यवस्थापनामुळे मेकॅनिकल विभागाला ही उंची गाठणे शक्य झाले आहे, असे प्राचार्य महेश भागवत यांनी सांगितले. कोकणातील विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण प्राप्त व्हावे या उदात्त हेतूने संस्थाध्यक्ष माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी हे महाविद्यालय सुरू केले. महाविद्यालयाने पंचविसाव्या वर्षात पदार्पण केले असून या कालखंडामध्ये प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे.
महाविद्यालयाच्या यशाबद्दल अध्यक्ष रवींद्र माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, कार्यकारी अध्यक्षा नेहा माने यांनी प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पत्रकार परिषदेला प्रद्युन्न माने, प्राचार्य महेश भागवत, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, प्रा.मंगेश प्रभावळकर उपस्थित होते.