दापोली:- नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांसाठी दापोली एसटी आगारातर्फे विशेष बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक रेश्मा मधाळे यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार एसटीसंगे देवदर्शन हा उपक्रम संपूर्ण राज्यामध्ये राबवला जात आहे. त्याअनुषंगाने येत्या १५ ऑक्टोबरपासून सकाळी ६.३० वा. सुटणारी दापोली-नाशिक ही बस वणी सप्तशृंगी गडापर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता दापोली-कोल्हापूर ही नवीन बससेवा सुरू करण्यात येणार असून, कोल्हापूरहून ती परतीसाठी सकाळी ६.३० वाजता निघणार आहे. दापोली-तुळजापूर ही बस संध्याकाळी ६.३० वाजता सुटणार असून, तुळजापूरवरून ही बस दापोलीसाठी रात्री ८ वाजता सुटेल.
हर्णै-पाजपंढरी येथून प्रवासी उपलब्धतेनुसार एकवीरा देवीदर्शन ही बस सोडण्यात येणार आहे. दापोली तालुक्यातील विविध गावांमधून त्या त्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार दाभोळ येथील श्री देवी चंडिका आणि मुरूड येथील श्री दुर्गादेवी दर्शन या विशेष बससेवा सुरू करण्यात येणार आहेत. महिलांसाठी ५० टक्के, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी १०० टक्के मोफत प्रवाससेवा उपलब्ध आहे.