रत्नागिरी:-कोकण किनारपट्टीलगत समांतर असणार्या आणि साडेनऊ हजार कोटी रुपयांची तरतूद असलेल्या कोकणातील रेवस ते रेडी या सागरी मार्गालगत येणार्या कोकणातील 50 शहरांच्या पर्यटन विकास आराखड्याला शासनाने तांत्रिक मान्यता अलीकडेच दिली.
या मार्गामुळे कोकणातील 50 शहरे जगभरातील पर्यटकांच्या पर्यटन नकाशावर येणार आहेत. यासाठी तेराशे कोटींच्या अतिरिक्त वाढीव निधीला नव्याने मंजुरी देण्यात आली आहे.
निसर्गत:च समृद्ध असलेल्या कोकणात सात जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यापैकी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील समुद्रकिनारे, प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतात. प्रस्तावित सागरी महामार्गाची सुरुवात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशी असल्याने या जिल्ह्यांतील किनार्यालगतची शहरेही पर्यटनियदृष्ट्या विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये 50 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील 25, रत्नागिरी जिल्ह्यातील 15 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 गावांचा समावेश आहे.
कोकण किनारपट्टीतील रेवस -रेडी या सागरी महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण पाहता मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणानंतर त्याला समांतर असलेल्या सागरी महामार्ग पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. विविध धार्मिक स्थळे, पर्यटन क्षेत्रे, समुद्रकिनारे, बंदरे, मासळी मार्केट, विमानतळ आधी या महामार्गावर आहेत. यामुळे या महामार्गालगत असेलल्या किनारी गावांना पर्यटनाच्या नव्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये रस्ते, पाणी, स्वच्छतागृहे आदी सुविधा येथे असणार्या ऐतिहासिक आणि पुरातन वास्तूना मिळणार आहे. या गावात अनेक भागात किनारे, कातळशिल्पे, ऐतिहासिक आणि स्वातंत्र्यसेनानींची जन्मस्थळे आहे. या वास्तूंनाही या सुविधांबरोबरच सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामध्ये रत्नागिरीतिल लोकमान्य टिळकांचे जन्मस्थळ, थिबा पॅलेस, पावस येथील स्वातंत्र्यसैनिक संयुक्त महाराष्ट्र चळळीचे नेते एस. एम. जोशी यांचे जन्मस्थळ, तसेच राजापूर तालुक्यातील वखारींचा समावेश आहे.