उदयपूर-जयपूर मार्गावरील ट्रॅकवर ठेवले दगड
जयपूर:-वंदे भारत ट्रेनचा घातपात करण्याचा प्रयत्न आज, सोमवारी सकाळी उजेडात आला. राजस्थानातील उदयपूर-जयपूर रेल्वे मार्गावर अज्ञात समाजकंटकांनी रेल्वे ट्रॅकवर लोखंडी रॉड आणि दगड लावून ठेवले होते.
सुदैवाने गाडीच्या लोको पायलटता याबाबत कल्पना आली आणि संभाव्य अपघात टळला.
यासंदर्भातील माहितीनुसार, वंदे भारत ट्रेन सकाळी 7.50 वाजता उदयपूरहून निघून चित्तौडगडला पोहोचली. चितौडगडहून भिलवाड्याला जाण्यासाठी निघाली असता सोनियाना आणि गंगरार रेल्वे स्थानकादरम्यानच्या मार्गावर, लोको पायलटला ट्रॅकमध्ये काही गडबड झाल्याचा संशय आला. लोको पायलटने ट्रेन थांबवली. ट्रेनमधून खाली उतरल्यानंतर सुमारे 50 फूट रुळावर दगड आणि रॉडचे तुकडे पडलेले दिसले. लोको पायलटने याबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर पोलिसांसह रेल्वेचे सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी 2 तरुणांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. रेल्वे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
उदयपूर ते जयपूर अशी वंदे भारत ट्रेन धावण्याची आठ दिवसांतील ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणाने रेल्वेवर दगडफेक करून काचा फोडल्या होत्या. ही घटना गांगरार (भिलवाडा) येथील मेवाड कॉलेजजवळ घडली. एक दिवसापूर्वी उदयपूरहून जयपूरला निघालेल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. चित्तोडगड-भिलवाडा रेल्वे मार्गावर मेवाड विद्यापीठाजवळ या ट्रेनवर दगडफेक करण्यात आली.