संगमेश्वर:-देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी मनोगत व्यक्त करताना महात्मा गांधी यांचे शिक्षण विषयक विचार उद्धृत केले, तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या सामाजिक , राजकीय कार्याचाही आढावा घेतला. यानंतर ‘महात्मा गांधी व्यक्ती व कार्य ‘ या विषयावरील शब्दप्रभू प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची ध्वनिफीत उपस्थितांना ऐकविण्यात आली.
दिनांक १ ऑक्टोबर रोजी ‘एक तास स्वच्छतेसाठी’ या उपक्रमांतर्गत वरिष्ठ विभागाचे एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. सुनील सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता शपथ दिली. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसर, बगीचा, मुख्य प्रवेशद्वार ते न्यू इंग्लिश स्कूल समोरील रस्त्याची स्वच्छता करून भारत सरकारच्या स्वच्छता अभियानाला बळकटी दिली.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सरदार पाटील, कनिष्ठ विभागाच्या एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये व सहकारी, तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या वरिष्ठ व कनिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत करण्यात आले.