संगलट,खेड/इक्बाल जमादार:-दापोली तालुक्यातील ताडील, सुरेवाड़ी येथे डुकराने हल्ला केल्याने एकजण गंभीररीत्या तर एक किरकोळ जखमी झाला असुन जखमीना दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ताडील सुरेवाडी येथील शंकर रहाटवळ वय ( ७४ ) हे आपली गुरे चारण्यासाठी सायंकाळच्या सुमारास रानमाळावरील वडाच्या झाडाजवळ गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत बबन रहाटवळ हे देखील होते.
यावेळी आधीच दबा धरून बसलेल्या डुकराने त्या दोघांवर हल्ला चढवला. अचानक झालेला हल्ल्यामुळे दोघेही भांबाउन गेले. यामध्ये ते दोघेही जखमी झाले. काय करावे हे दोघांनाही समजेना. अखेर त्या डुकराचा रौद्र अवतार पाहून बबन रहाटवळ हे एका झाडावर चढून बसले. तर शंकर रहाटवळ हे त्या डुकराच्या तावडीत सापडले. त्याने त्यांना गंभीरित्या जखमी केले आहे. त्यांच्या हातावर, कोपरावर, ढोपरावर तसेच डोक्यावर सूळयाचा मारा केला आहे. त्यांच्यावरील जखमा ह्या खोलवर असून त्यांना सध्या दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून अधिक उपचारासाठी त्यांना इतरत्र हलवण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. तर बबन राठोड हे किरकोळरीत्या जखमी झाले आहेत
घटनेची माहिती मिळताच दापोलीच्या तहसीलदार सौ. अर्चना बोबे-घोलप तसेच वनविभागाचे रेंजर श्री. पाटील, वनपाल श्री. एस. एस. सावंत, वनरक्षक शुभांगी भिलारे व शुभांगी गुरव यांनी तात्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी दापोली उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली होती. वन विभाग जखमींकडून जाबजबाब नोंदवून घेत असून उद्या वनविभाग घटनास्थळावर जाऊन पाहणी करणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.